वेकोलिच्या सुरक्षा रक्षकावर कोळसा तस्करांचा हल्ला
विवेक तोटेवार, वणी: वणी तालुक्यातील भालर येथे सुरेश रक्षकावर हल्ला झाला असून यात सुरक्षा राशक जखमी झाला आहे. आज शनिवारी दुपारी चार कोळसा तस्करांनी हा हल्ला केला. महत्वाचे म्हणजे यावेळी क्षेत्रीय सुरक्षा अधिकारी सोबत होते व त्यांच्या पुढेच हा हल्ला झाला. याबाबतची तक्रार वणी पोलिसात देण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, कृष्णकुमार अशोककुमार मिश्रा (36) हे भालर येथे वेकोलीत सुरक्षा रक्षक या पदावर कार्यरत आहे. शनिवारी दुपारी ते व क्षेत्रीय सुरक्षा अधिकारी किरण जॉय हे दुपारी 2 वाजताच्या सुमारास कोलार पिंपरी चेक पोस्टवर तपासणी करीत गेले होते. यावेळी त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक गोकुल शिवप्रसाद व वेकोळीचे जवान विकी त्रंबक धाबे व स्वप्नील सतीश केंद्रे हेही यावेळी उपस्थित होते. तपासणी करून निघत असताना दोन दुचाकी वाहने घेऊन चार जण येऊन त्यांच्याजवळ थांबले.
यामध्ये शेख समीर (30), खुर्शीद आबेद हुसैन (28), धनराज येसेकर (30), जावेद (40) हे होते. यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. व दोघांनी गाडीवरून उतरून कृष्णकुमार मिश्रा यांना मारहाण करण्यास सुरुवात केली व जीवे मारण्याची धमकी दिली. ‘पोलिसात तक्रार दाखल करा पोलीस आमचे काहीही करू शकत नाही’ असे धमकावले. मारहाणीत कृष्णकुमार यांच्या तोंडाला मार लागला आहे.
महत्वाचे म्हणजे शनिवारी एस पी व आय जी वणीत असताना ही घटना घडली. यावरून समजून येते की, कोळसा चोरी करणाऱ्यांची हिंमत किती वाढली आहे. त्यातच शेख समीर व खुर्शीद यांच्यावर वेकोलिचा कोळसा चोरी केल्याची तक्रार दाखल आहे. तरीपण कायद्याला धारेवर धरून व पोलीस प्रशासनास न जुमानता कोळसा तस्करी करणारे आता वेकोलीच्या सुरक्षा रक्षकांवरच हल्ला करीत आहेत. यामागे वणीतील एका मटका किंगचा हात असल्याची चर्चा वणीकरात होत आहे.
मिश्रा यांच्या तक्रारीवरून चारही आरोपीवर कलम 324, 506, 504 भादवी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.
कोळसा तस्करांकडून पोलिसांना हफ्ता जातो आणि त्यामुळे कोळसा तस्कर माजले असून त्यांची हात उगारण्यापर्यंत मजल गेलीये अशी चर्चा वणीत रंगतये.