अत्तरासारखेच सुगंधी गिरीबाबू

0
सुनील इंदुवामन ठाकरे, वणी:  वणीच्या बसस्थानकावर गिरीबाबू अत्तरवाले हमखास दिसतात. जवळपास 20-25 वर्षांपासून वणीकर व बसस्थानकावर नियमित येणारे प्रवासी त्यांना पाहत आहेत. आरसे लावलेल्या शानदार पेटीत अत्तरांच्या नीट रांगेत लावलेल्या छोट्याा छोट्या कुपींचं चालतं-फिरतं दुकान. हे दुकान तसं सगळ्यांना दिसत असतं. तर काहीजण त्यांचा शोध घेत इथे येतात.

 

अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे डिओड्रंटस्, परफ्यूम्स, स्प्रेज् मार्केटमध्ये  आहेत. मात्र अत्तरांचे शौकीनही तेवढेच दर्दी असतात. ते अत्तरासाठी कॉम्परमाईज करीत नाहीत. वणीत देशी, कन्नोजचे अत्तर इतरत्र मिळतंही. मात्र अत्तरांच्या शौकीनांची पहिली चॉईस मात्र गिरीबाबूच असतात.

मध्यम आकारांच्या दहा-पंधरा बाटल्या विविध रंगांच्या सुगंधांच्या बाटल्यांनी भरलेल्या असतात. कच्ची कली, शरारत, मोगरा, हिना, फिरदोस, पॉण्डस् पॅरीस, चार्ली अशी काही गमतीदार आणि पारंपरिक अत्तरांचे ब्रॅण्ड गिरीबाबू विकतात. मोठी कुपी 40 रूपयांची तर छोटी 20 रूपयांची असते.

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गिरीबाबूंच्या आयुष्याची सुरुवात झाली. वडील गिरड येथे अत्तराचा व्यवसाय करायचे. काळेकुट्ट आयुष्य अत्तराने सुंगधित करण्याचा प्रयत्न वडलांचा होता. आदर्श हायस्कूल वणी येथे गिरीबाबूंचे शिक्षण झाले. परिस्थिती गरीब होती. त्यामुळे पुढील शिक्षण त्यांना घेता आले नाही.

पोटापाण्यासाठी त्यांनी सायकल रिक्षा चालवायला सुरुवात केली. गिरीबाबू स्वतःही रसिकच आहेत. त्यांची सायकल रिक्षादेखील पाहण्यासारखी होती. ‘‘राठोड एक्सप्रेस: चालक-मालक’’ असं आकर्षक स्टाईलने त्यांच्यावर लिहिलेलं असायचं. वणीतल्या जुन्या लोकांना त्यांची ही रिक्षा अजूनही आठवत असेल. याही व्यवसायात ते प्रामाणिकपणे रमलेत. दारू वगैरेचं व्यसन त्यांनी टाळलं. तसेच त्यांचा इतरांशी व्यवहार उत्तम असायचा. त्यामुळे त्यांच्या रिक्षाला पहिली पसंती नेहमीच मिळायची.

पुढे चालून त्यांना पोटाच्या विकाराने ग्रासलं. सायकल रिक्षा ओढणे अवघड होऊ लागलं. आता पुढे काय? असा प्रश्नदेखील त्यंाच्या पुढ्याात उभा राहिला. मग आपला वडलोपार्जित, पिढीजात अत्तराचा व्यवसाय त्यांनी निवडला.

यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक आठवडी बाजारात ते आपले अत्तराचे पेटीवाले दुकान घेऊन फिरू लागले. वाणीत गोडवा आणि व्यवहारातील प्रामाणिकपणा यामुळे त्यांचा धंदा जोर धरू लागला. राजुरा, कोरपना, बेला, पाटण, जिवती, गडचांदूर येथे त्यांचा गिÚहाईकांचा गोतावळा वाढू लागला. लोक दर आठवड्यााला त्यांची वाट पाहू लागले. दोनशे ते पाचशे रूपये रोजी ते सध्या कमावतात.

नागपूरवरून हजार-दोन हजार रूपयांचा माल ते विकत आणतात. त्यातही दर्जा व गुणवत्ता याची ते खास काळजी घेतात. त्यामुळे त्यांचे ग्राहक हे पक्के असतात. वयाच्या 65 व्या वर्षीदेखील तेवढ्यााच उत्साहाने ते आपल्या कामात सक्रीय असतात. बायको, दोन मुलं, सुना, नातवंड असा त्यांचा सुरेख संसार आहे. नेहमी व्यवसायाच्या भटकंतीवर असल्यामुळे बरेचदा एकच वेळ त्यांचं जेवण असतं. चहाचे फार शौकीन आहेत गिरीबाबू.

आयुष्य त्यांचं खाचखळग्यांनी भरलेलं. अनेक विपरित परिस्थितींशी सामना करत त्यांनी त्यांचं आयुष्य उभं केलं. सुगंध हा त्यांचा व्यवसायदेखील आहे आणि स्वभावदेखील. त्यांची भेट सर्वांनाच सुगंधित करते. अत्तर आपण बाहेरून लावतो. पण त्याचा गंध अगदी आतल्या मनाला सुखावतो. आनंदाचं अत्तर आपण बाहेरून लावायलाच पाहिजे. मग तो आनंद सुगंधासारखा आत शिरतो.

आपल्या काळजात खोलवर अशीच अत्तराची कुपी असते. आपण आपल्या दुःखातच रमतो. त्यामुळे त्या अंतरातल्या सुगंधी कुपीकडे आपले लक्ष जात नाही. काळजाच्या आतल्या कुपीचं झाकण उघडलं की अंतःकरण आपोआप सुगंधित व्हायला लागतं. बाहेर कितीही विषारी दर्प असले तरी आपण आतल्या सुगंधाने दरवळत जातो. मंगेश पाडगावकर म्हणतात, अगदी तसंच….

प्रत्येकाच्या मनात एक
गोड गोड गुपीत असतं
दरवळणारं अत्तर जसं
इवल्याच्या कुपीत असतं
आपण असतो आपली धून
गात राहा
आपण असतो आपला पाऊस
न्हात राहा
झुळझुळणा-या झ-याला
मनापासून ताल द्या
मुका घ्यायला फूल आलं
त्याला आपला गाल द्या..

– सुनील  इंदुवामन ठाकरे
8623053787, 9049337606

Leave A Reply

Your email address will not be published.