अस्सल गावरान सेंद्रिय मिरचीचा झणझणाट अगदी घरपोच

पदवीधर युवकाची किमया, मिरचीचे एकरी 2 लाखांचे उत्पन्न

बहुगुणी डेस्क, वणी: अनेक पदवीधर युवक-युवती बेरोजगारीमुळे हताश झालेत. मात्र यावरही काही युवक मात करतात. आपलं कर्तृत्व सिद्ध करतात. त्यातील एक युवक म्हणजे गणेश नानाजी रांगणकर. या युवकाने प्रचंड परिश्रम घेतलेत. आपल्या शेतात तो राबराब राबला, शेतीत पारंपरिक ऐवजी वेगळ्या पिकांची वाट धरली आणि शेतात अभिनव प्रयोग करून विक्रमी उत्पन्न घेतले. हा नव्या पिढीसाठी नक्कीच खूप मोठा आदर्श ठरेल. त्यातही मिरचीचं उत्पादन त्यानं सेंद्रिय पद्धतीनं घेतलं. शेणखत आणि पारंपरिक खतांचाच त्याने वापर केला. कोणत्याच रसायनांचा वापर त्यानं आपल्या शेतीत केला नाही. ही मिरची सध्या विक्रीसाठीही उपलब्ध आहे. त्यामुळे अस्सल गावरान मिरचीचा झणझणाट सगळ्यांनाच अगदी घरपोच अनुभवता येणार आहे. त्यासाठी आपण गणेश याला 9637305262 या नंबरवर संपर्क साधू शकता.

गणेश हा वणी तालुक्यातील नांदेपेरा येथील रहिवासी असून त्याचा मुख्य व्यवसाय शेती आहे. परिसरातच त्याची 5 एकर शेती आहे. यासह तो तहसिल कार्यालय वणी येथे अर्जनविस म्हणूनही काम करतो. मात्र त्याचा ओढा हा शेतीकडे अधिक आहे. तो सुशिक्षित आणि कल्पक आहे. शेतीत नवनवीन प्रयोग करायला त्याला आवडते. तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीचा अभ्यास करून कमी खर्चात जादा उत्पन्न घेण्यासाठी तो नेहमी प्रयत्नशील असतो. याकरिता वयाच्या 25 व्या वर्षापासूनच त्याने प्रगतीशील शेतकऱ्यांच्या शेतीला भेटी देणे सुरू केले.

यापूर्वी गणेशचे वडील पारंपारिक पद्धतीने शेती करीत होते. शेतात कपाशी, सोयाबीन, तूर, हे पीक घेत होते .मात्र शेतात लागणारा लागवड खर्चही निघत नव्हता. नेहमी वडील व आई कापूस, तूर पिकांसह ज्वारीसारखी पिके घेत होते. मात्र ही पीकपद्धती आर्थिकदृष्ट्या परवडत नव्हती. या पिकांच्या संगोपनाकरिता खर्च जादा येत होता. नफा कमी मिळत होता. त्यामुळे नेहमी शेती व्यवसाय परवडत नसल्याने आईच्या चेहऱ्यावर उदासीनता दिसून येत होती. मग पारंपारिक पद्धतीची शेती नफ्याची नसल्याने आधुनिक शेती करण्याची जिद्द गणेशने मनात धरली.

हळद ते मिरची प्रवास
नवीन काहीतरी करायचे म्हणून गणेशने 2016 साली प्रथम हळद या पिकाची एका एकरामध्ये लागवड केली. ठिबक सिंचनाद्वारे त्याने पिकाला गरजेनुसार पाणी दिले. त्या पिकाची देखरेख, संगोपन स्वत: गणेशने केले.
नऊ महिन्यांच्या कालावधीनंतर हळद तयार झाली. या महिन्यात त्याने हळदीची काढणी सुरू केली, तेव्हा हळदीचे बेणे 2 हजार रुपये प्रति क्विंंटल या दराने विक्रीस काढले. यात त्याला 5 लाखांचे उत्पन्न मिळाले. एक लाख खर्च वजा करता 4 लाख रुपये निव्वळ नफा होता. तेव्हापासून गणेशने मागे वळून न पाहता शेतात अनेक प्रयोग करणे सुरू केले. 

नवनवीन प्रयोग व आधुनिकतेचा वापर
असं म्हणतात की जमिनीचा कस टिकून राहण्यासाठी पिक बदलवत राहावं. गणेश हा प्रयोग दरवर्षी करतो. कधी कोबी तर कधी बिट तर कधी लिंबू अशा पिकांची लागवड तो करतो. याला त्याने आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. त्याच्या शेतात असलेली बोअरवेलची मोटर ही मोबाईल वरून चालू बंद होते. तर शेतात त्याने सौर कॅमेरे बसवलेले आहे. 

यावर्षी मिर्चीची लागवड
गेल्या वर्षी मिरचीची मोठ्या प्रमाणात मागणी होती. त्यामुळे यावर्षी गणेशने मिरचीचे उत्पादन घेण्याचे ठरवले. गणेशने शेतीत मिरची लागवड केली. वणी तालुक्यात तीव्र तिखट मिर्चीला मागणी आहे. याच मागणीला धरून गणेशने तिखट वाणाच्या मिरचीची लागवट गेली. लाल, हिरव्या मिर्चीतून एकरी दोन लाख रूपयांचे उत्पन्न घेतले आहे. ही मिरची सध्या विक्रीसाठीही उपलब्ध आहे. ही सेंद्रीय पद्धतीने पिकवलेली मिरची आपल्याला हवी असल्यास आपण संपर्क साधू शकता.

संपर्क –
गणेश रांगणकर
मु. पो. नांदेपेरा ता. वणी 
मो. 9637305262

Comments are closed.