बहुगुणीकट्टा: बरं झालं गेली…
सुनील इंदुवामन ठाकरे: बापरे! एसी बंद झालेत. मोठमोठाले भाषणाचे माईक बंद झालेत. कसं सगळंच कोलमडलं. गावात पावसाळी अधिवेशनात वीज गेली. सर्वच पक्षांच्या नेत्यांना किती त्रास झाला असेल. त्यांची किती गैरसोय झाली असेल. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या झडल्या असतील.
वीज जाणं किती मोठी व गंभीर बाब असते नै! एसी बंद होतो महत्त्वाचं म्हणजे. कामकाज विस्कळीत होतं. या वीजेचं जाणं बऱ्याच जमान्यानंतर राजकीय नेत्यांनी अनुभवलं असेल. ‘वीज’ जिला इलेक्ट्रिसिटी म्हणतात कशी कोसळते, हे शेतकऱ्यांना, भूमिपुत्रांना विचारा. शेतात असलेल्या पिकांना पाणी द्यायला तो वाट पाहत बसलेला असतो. पिकं सुकायला लागतात. त्याचा आत्माही असाच कोरडा व्हायला लागतो. जीव तीळ तीळ तुटत असतो. रात्री बेरात्री ही वीज कधीतरी येते. हातात एखाद्या टॉर्च नाहीतर चंद्राच्याच साक्षीनं हा शेतात पाणी द्यायला जातो.
परीक्षांच्या काळात लेकरं वीज गेल्यावर अंधारात आपल्या भविष्याचा उजेड शोधत बसतात. लेकुरवाळ्या घरातल्या आईची तर पूर्ण दमछाकच होते, तिच्या लेकराला निजवताना. इलेक्ट्रिकच्या भरवश्यावर पोट भरणाऱ्या छोट्या दुकानदारांची भाकरी ही वीज आली तरच येते.
प्रगती झालीच पाहिजे. महानगरात मेट्रोच काय लोकल हवाईसेवा देखील सुरू झालीच पाहिजे. पण लहान गावांचं, खेड्यांचं काय? पावसाळा आला तर खेडं गावापासून तुटतं. शाळा, दवाखाना व अन्य सुविधा राहिल्या जागेवर. त्यातच एखादी अपघात, बाळंतपण अशी इमर्जन्सी बाब आली तर राहिलंच. पावसाळ्यांत अनेक खेडी ही वेगळ्या ग्रहावरच जातात. त्यांचा पृथ्वीवासियांसोबत संपर्कच तुटतो.
समजा मध्यमवर्गीय माणसाचं घर असतं. त्याचं छत पावसाळ्यात गळतं. त्याला अंगणात टाईल्स बसवायच्या असतात. घरात संगमरवरी फरशा लावायच्या असतात. घराला चांगला प्लास्टिक पेंट द्यायचा असतो. मोठं झुंबर लावायचं असतं. यातील पहिली गोष्ट तो काय करेल? तो प्राधान्य कशाला देईल. तो सर्वात आधी झुंबर लावेल की संगमरवरी फरशा बसवेल? प्लास्टिक पेंट लावेल काय? नक्कीच नाही.
सुरुवात तो घराच्या गळत्या छतापासूनच करेल. छत चांगल राहिलं तर बाकी सगळं टप्प्याटप्प्यानं करताच येईल. रस्ते अजूनही नीट नाहीत. काही ठिकाणी तर रस्तेच नाही. वीज तर माहेरवासीणी सारखी येत जात राहते. रस्ते, वीज, पाणी खेड्यापाड्यांपर्यंत पोहचलेच नाही. कोणत्याच सत्तेनं हे खेड्यांसाठीचं उद्दीष्ट 100 टक्के पूर्ण केलं नाही. किंवा त्यावर लक्षही दिलं जात नाही.
‘‘वीज’’ बंद राहिली तर काय काय कोसळंत हे शेतकऱ्यांनाच विचारा. किंबहुना त्यांच्यासोबत राहून ते प्रत्यक्ष अनुभवा. हायस्पीड फोर जी वायफायने शेतात पाणी नाही देता येत. मेट्रोने खेड्यापाड्यात ठिबक सिंचन, तुषार सिंचन नाही करता येत. खेडे म्हणजे देशाचा गाभारा आहे. तो गळतोय. त्यातील देव भिजतोय. सभामंडप देवासाठी नसतो. तो आपणच वापरतो. गाभाऱ्याची गळती थांबली पाहिजे. देव उन्हाळ्यात भाजतो. पावसाळ्यात भिजतो. हिवाळ्यात कुडकुडतो. त्यांचं पाहा. गाभारा सलामत तो सभामंडप पचास…..
सुनील इंदुवामन ठाकरे
8623053787
9049337606