सरपंच ते राज्यपाल, थरारकच राहिला ‘या’ कर्मयोग्याचा प्रवास

सुधाकरराव नाईक यांची २१ ऑगस्टला जयंती

0

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: मातीशी जुळलेला माणूस हा आकाशाला उंच गवसणी घालू शकतो. जलक्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक हे त्याचं जिवंत उदाहरण. शेती, जलसंधारण, शिक्षण अशा विविध क्षेत्रांत त्यांनी केलेली कामगिरी ही डोळे दिपवणारी आहे. एका लहानशा खेड्यातील सरपंचपदापासून एका राज्याचे राज्यपाल हा प्रवासदेखील सर्वांनाच प्रेरणादायी आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गहुली येथे 21 ऑगस्ट 1934 रोजी त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांच्यावर महामानवांच्या विचारांचा प्रभाव होता. समाजकारण करता करता ते राजकारणात उतरले. गहुली गावाचे ते सरपंच झाले. गावाच्या सर्वांगिण विकासाकरिता त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतलेत.

कल्पक आणि सृजनशील नेतृत्त्व ही त्यांची ओळख होती. त्यांच्या कार्याचा आवाका वाढत राहिला. ते पुसद पंचायत समितीचे सभापती झाले. नंतर यवतमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही त्यांनी आपल्या कर्तृत्वाने समृद्ध केलं. त्यांच्या कामाचा झपाटा वाढला. त्यांच्या कर्तृत्वाच्या कक्षाही रुंदावल्यात. इतक्या, की ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि नंतर हिमाचल प्रदेशाचे राज्यपालदेखील झालेत.

ग्रामीण व कृषी संस्कृतीत ते बहरलेत. अनुभवांनी परिपक्व झालेत. त्यांना इथल्या शेतीची नस न् नस ठाऊक होती. त्यांचं शेतीविषयक स्वतंत्र आणि प्रगल्भ चिंतन होतं. त्यांच्या निरीक्षणात आलं की, इथली बागायती शेती बरी आहे. मात्र कोरडवाहू शेती अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. शेतीला पाणी मिळालं तर शेतकरी सुखी होईल.

त्यासाठी त्यांनी जलसंधारणाचा अत्यंत आशादायी व भव्य प्रकल्प राबवायला सुरुवात केली. पाण्याची कमतरता हा शेतकऱ्यांची सर्वांत गंभीर समस्या आहे, याची त्यांना जाण होती. ते मुख्यमंत्री असताना त्यांनी जलसंवधर्नासाठी स्वतंत्र खातं तयार केलं. या खात्यासाठी स्वतंत्र मंत्रीदेखील नियुक्त केला. ते स्वतःहून या विभागाकडे लक्ष देत. या खात्याअंतर्गत त्यांनी अनेक धाडसी कार्यक्रम राबविलेत.

पाणी हा शेतीचा आत्मा आहे. मोठी धरणं बांधण्यात बराच वेळ लागतो. ते आवश्यकतेनुसार बांधलीही जातील. मात्र आजच्या घडीला आपण लहान लहान जलसंधारणाची कामं करू शकतो, हे त्यांनी अनुभवलं. असं केल्यास शेतकरी निराधार होणार नाहीत, खचणार नाहीत, त्यांचं पुनर्वसन करावं लागणार नाही, हे त्यांना कळून चुकलं होतं.

त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत पाण्याच्या अनुषंगाने भरीव कामगिरी केली. किंबहुना ती एक महान जलक्रांतीच होती. रात्रंदिवस त्यांच्या डोक्यात जलसमृद्धीचाच विचार घोळत असते. हा विचार त्यांना कधीच स्वस्थ बसू देत नव्हता. माय-बाप शेतकऱ्यांची जाणीव त्यांना होती. याच जाणीवेतून त्यांनी अनेक कार्य केलीत.

ते पुढे हिमाचल प्रदेशाचे राज्यपालदेखील झालेत. मात्र त्यांना त्यांची भूमी वारंवार साद देत होती. ते तिथून परत आल्यावर याच जलक्रांतीत अत्यंत वेगाने पुन्हा उतरलेत. जलसंधारण समितीचे अध्यक्ष राहिले. नेटाने, नियोजनांनी त्यांनी या कामांचा पाठपुरावा केला.

संत सेवालाल महाराजांचे विचार ते प्रत्यक्ष कृतीत आणत. त्यांचा संदेश विविध माध्यमांतून लोकांपर्यंत पोहचवण्याचा ते प्रयत्न करीत. त्यांनी सुरू केलेल्या जलक्रांतीत सातत्य ठेवलं असतं तर आज शेतीचं चित्र काही निराळंच राहिलं असतं. त्यांच्या जलक्रांतीचे प्रयोग संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशातदेखील प्रभावी ठरले असते.

‘सर्वप्रथम वाहते पाणी चालवायला शिका, चाललेले पाणी थांबवायला शिका आणि थांबलेले पाणी जिरवा’ हा जलमंत्र सुधाकर नाईकांनी दिला. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहीम राबविणारं महाराष्ट हे त्यांच्या कारकीर्दीतलं पहिलं राज्य होतं. भविष्यातील पाण्याची समस्या त्यांनी आधीच हेरली होती.

शेतकऱ्यांसाठी त्यांचा जीव तीळ तीळ तुटत होता. शेतीसाठी घेतलेल्या 10 हजार रूपयांपर्यंतच्या कर्जाला 10 टक्के व्याज लागत होतं. शेतकरी त्यामुळे अधिक आर्थिक अडचणीत येत होता. त्यांनी हे व्याज 10 टक्क्यांवरून कमी करून 6 टक्क्यांवर आणलं. शेतकऱ्यांसाठी घेतलेलं ते अत्यंत महत्त्वाचं आणि शेतकऱ्यांच्या भल्याचं खूप मोठं पाऊल होतं.

ते स्वतः सरपंच राहिले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांचं त्यांनी प्रतिनिधीत्त्व केलं होतं. त्यामुळे त्यांना यातील खाचखळगे व बऱ्याच गोष्टी प्रत्यक्ष अनुभवांतून माहिती होत्या. या स्थानिक स्वराज्य संस्था अधिक बळकट करण्याचं काम सुधाकरराव नाईक यांनी केलं. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा त्यांनी मिळवून दिला.

त्यांच्या निर्णयांचं गांभीर्य आणि महत्त्व वाढवून दिलं. प्रशासनातील अधिकाऱ्यांना त्यांचे रास्त निर्णय मान्य करणं आवश्यक झालं. त्यासोबतच प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्यांची जाणीव त्यांनी आपल्या कृतीतून करून दिली.

समाजातील गुंडप्रवृत्ती ही प्रगतीसाठी घातक असते. या प्रवृत्तींना भांडवलदारांचा आणि राजकारण्यांचा सपोर्ट होता. ही गुंडगिरी मोडून काढण्यासाठी त्यांनी अनेक प्रभावी पावलं उचललीत. पत्रकार किंवा अन्य हे याबद्दल व्यक्त होण्यापलीकडे काहीच करू शकत नव्हते. मात्र नाईक यांनी प्रत्यक्ष या गुंडप्रवृत्तीला वेसण घातली हे विषेष. राजकारणी म्हणवून घेणाऱ्यांनाही त्यांचा वचक होता.

एक प्रामाणिक राजकारणी आणि कुशल संघटक म्हणून त्यांचं नाव प्रामुख्यानं घेतलं जातं. आपल्या पक्षाशी ते प्रामाणिक राहिलेत. कोणतीही व्यक्ती ही पक्षापेक्षा मोठी नाही याचा त्यांनी वारंवार आग्रह धरला. त्यांना पक्षाला बळकट केलं. पक्ष वाढवला. अगदी लहानातल्या लहान कार्यकर्त्याची दखल त्यांनी घेतली. नव्या पिढीला प्रेरणा दिली. प्रोत्साहन दिलं. मार्गदर्शन केलं. दिशा दिली.

त्यांनी आपल्या आयुष्यात कधीच बडेजाव मिरवला नाही. प्रत्यक्ष जमिनीशी ते जुळलेले होते. त्यांमुळे सहजता ही त्यांच्यात ओतप्रोत भरली होती. कोणता दिखावा करणं, वाहवाह मिळवण, उगाच स्वतःचं कौतुक करवून घेणं त्यांना आवडत नसे. खूप मोठमोठाली स्टाईलीश भाषणं करून जनतेला शाब्दिक गुंगारा देणं त्यांना आवडत नसे.

ते अगदी मुद्देसूद बोलायचे. जे त्यांना मांडायचं आहे, सांगायचं आहे, ते अगदी नेमक्या शब्दांत सांगायचे. त्यांचं एखादं वाक्य तर बंदुकीच्या गोळीसारखंच आरपार भेदून जायचं. त्यांनी आपल्या वेळेचा जास्तीत जास्त उपयोग लोककल्याणासाठी व्हावा यासाठी प्रयत्न केलेत. अत्यंत करारी बाण्याचे होते सुधाकरराव नाईक.

ते दिलेला प्रत्येक शब्द प्रामाणिकपणे पाळत. कोणालाही उगाच आश्वासन देत नसत. कुणालाही आशेवर ठेवत नसत. काम शक्य आहे किंवा नाही, याची जाणीव ते आधीच करून देत. होकार असो की नकार ते अगदी स्पष्टपणे देत.

शिक्षण अणि रोजगार यांचा समन्वय कसा घालता येईल, याचा ते विचार करत. यासाठी त्यांनी महाराष्ट्रात विनाअनुदानित तत्वावर इंजिनिअरिंग कॉलेजेस उघडण्याचा निर्णय घेतला. इंजिनिअरिंग शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक संधी त्यांच्या प्रयत्नांतून उपलब्ध झाल्यात.

मुलींच्या शिक्षणासाठीदेखील ते आग्रही होते. मुलींचे शिक्षणशुल्क माफ करण्याचं त्यांनी ठरवलं. महिला आणि बालकांच्या कल्याणासाठी त्यांनी स्वतंत्र विभाग स्थापन केला. कृषी, पाटबंधारे, शिक्षण, उद्योग, महसूल, पुनर्वसन, समाजकल्याण, सांस्कृतिक कार्य, गृहनिर्माण ही खाती त्यांनी यशस्वीरीत्या सांभाळलीत.

सन १९७२ ते १९७७ या काळात ते यवतमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. १९९४ मध्ये हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. १९९८ मध्ये वाशिम मतदारसंघातून लोकसभेवर निवड झाली. अ. भा. काँग्रेसचे ते सरचिटणीस होते. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला. १९९९ मध्ये जलसंधारण परिषदेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली.

मुख्यमंत्रीपदाचा २५ जून १९९१ ते ६ मार्च १९९३ हा कालावधी म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाचा झंझावातच होता. सतत लोकांसाठी झटणाऱ्या या महामानवाचे 10 मे 2001 रोजी निधन झाले. त्यांचा स्मृतिदिन हा जलसंधारण्दिन म्हणून साजरा केला जातो. या महामानवाच्या कार्यास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.