मारेगाव तालुक्यातील काँग्रेसचे काही नेते, कार्यकर्ते पक्ष सोडण्याच्या वाटेवर?

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव बाजार समितीच्या संचालक पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने 18 पैकी 17 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. यात काँग्रेसला 13 जागा मिळाल्या. त्यामुळे काँग्रेसला सभापतीपद तर शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपसभापती पद मिळणे निश्चित होते. त्यानुसार अनेक दिग्गजांनी सभापतीपदासाठी फिल्डिंग लावली. मात्र दिग्गज व अनुभवी नेत्यांना मात देत गौरीशंकर खुराणा यांची सभापती पदासाठी निवड करण्यात आली. पक्षात सक्रिय नसणा-या व एका नवख्या चेह-याला संधी दिल्याने काँग्रेसमध्ये अनेक नेते नाराज झाले होते. मात्र आता ही नाराजी वाढून यातील काही नेते, कार्यकर्ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा मारेगाव तालुक्यातील राजकीय वर्तुळात रंगत आहे. यातील काही भाजप तर काही लोक सेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जाण्याच्या विचारात असल्याचे बोलले जात आहे.

नाराजीचे कारण काय?
मारेगाव तालुक्यात काँग्रेस मजबूत स्थितीत आहे. शिवार सहकार क्षेत्रातही काँग्रेसचे वर्चस्व आहे. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीसाठी नेत्यांची पहिली पसंती ही काँग्रेसला होती. बाजार समितीच्या निवडणुकीआधी काही काँग्रेसशी संबंधीत पुढा-यांचे तिकीट कापले गेले. तर काहींनी भाजपशी घरोबा करून त्यांच्यासोबत बाजार समिती लढवली. मात्र यात त्यांना अपयश आले. मात्र शेवटी मविआचा विजय झाला. मात्र सभापतीपदाची माळ गौरीशंकर खुराणा यांच्या गळ्यात पडली. या नवीन नेतृत्त्व उदयाने अनेकांच्या महत्त्वाकांक्षांना तडा गेला. याला काही काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा विरोध होता. यातून ही नाराजी आल्याचे बोलले जात आहे.

कोणत्या पक्षात जाण्याची चर्चा?
मारेगाव तालुक्यातील काही ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजी असली तरी त्यांना काँग्रेसशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ते नाराजी असतानाही इतर विचार करण्याचा धोका पत्करण्यास तयार नाही. काँग्रेसमुळे तालुक्यातील अनेक नेत्यांना महत्वाची पदे उपभोगायला मिळाली. परंतु आता पक्षात आपले महत्वाचे स्थान राहणार नसल्याच्या भीतीतून त्यांनी आतापासूनच इतर सहकाऱ्यांच्या भेटीगाठी घेणेही सुरु केल्याचे समजत आहे. शिवाय दुस-या फळीचे नेते, कार्यकर्ते यांची नाराजी असली तरी त्यांची महाविकास आघाडीपासून दूर जाण्याची इच्छा नाही. त्यामुळे ते सेनेच्या (उठाबा) एका गटात जाण्याच्या विचारात असल्याची चर्चा आहे. तर सध्या आमदार हे भाजपचे असल्याने शिवाय भाजपने वणी बाजार समितीमध्ये दणदणीत विजय मिळवल्याने ते भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा आहे. तर दुसरीकडे नेते व कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न देखील सुरू असल्याचेही बोलले जात आहे. 

कुणीही पक्ष सोडणार नाही – मारोती गौरकार
पक्ष सोडण्याच्या चर्चेत कोणतेही तथ्य नाही. पद किंवा तिकीटावरून थोडी बहुत कुरबुरी असली तरी ती सर्वच पक्षात असते. त्यामुळे कुणी पक्ष सोडत नाही. गौरीशंकर खुराणा हे पूर्वी पासून काँग्रेसमध्ये काम करीत आहे. त्यांच्या नावाला इतर संचालकांची सहमती असल्यानेच त्यांची सभापती पदी एकमताने निवड करण्यात आली. काँग्रेस पक्ष तालुक्यात एकसंघ असून अशी काही चर्चा असल्यास ती निराधार आहे.
– मारोती गौरकार, तालुका प्रमुख, मारेगाव काँग्रेस

गौरीशंकर खुराणा यांचा उदय
गौरीशंकर खुराणा यांच्यावर काँग्रेसमध्ये फारसे सक्रिय नसल्याचा आरोप होतो. या आरोपामध्ये बरेच तथ्य देखील आहे. खुराणा हे पक्षाऐवजी त्यांनी स्थापन केलेल्या संघटनेद्वारा तालक्यात सक्रिय असतात. अलिकडच्या काळात त्यांनी संघटनेमार्फत तालुक्यात एक चांगला होल्ड निर्माण केला आहे. बाजार समितीचा विचार केला तर खुराणा यांनी मविआच्या विविध नेत्यांची मोट बांधली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनात नेतृत्त्व करीत काँग्रेसला जे यश मिळाले त्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या या कामगिरीमुळेचे त्यांचे नाव अचानक पुढे आल्याचे राजकीय जाणकार सांगतात.

मारेगाव तालुक्यात काँग्रेसचे पारडे जड आहे. त्याला खिंडार पडू नये यासाठी काँग्रेसचे नेते प्रयत्नशील आहे. बाजार समितीतील नाराजीमुळे कार्यकर्ते पक्ष सोडणार की पक्षात राहूनच आपला गट मजबूत करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.