Breaking – वर्धा नदीची पाणी पातळी वाढली, तालुक्यातील 5 गावांचा संपर्क तुटला

जितेंद्र कोठारी, वणी : मागील 3 दिवसांपासून अमरावती संभागमध्ये सुरु जोरदार पावसामुळे वर्धा नदीच्या पाण्याची पातळी वाढून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. वर्धा नदी काठावर असलेले वणी तालुक्यातील 5 गावाचा संपर्क तुटल्याची माहिती महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. यात भूरकी, सेलू, नवीन सावंगी, चिंचोली व कवडशी या गावाचा समावेश आहे. पूर परिस्थिती लक्षात घेता महसूल प्रशासन सज्ज झाला आहे. कोणत्याही आपात परिस्थितीत नागरिकांना व प्राण्यांना सुरक्षित हलविण्यासाठी बचाव पथक व बोटी सज्ज ठेवण्यात आली आहे.

अमरावती जिल्ह्यातील, अपर वर्धा, लोअर वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातील बेंबला प्रकल्पाच्या केचमेंट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे वर्धा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा निसर्ग झाल्याचे सांगण्यात येते. मागील वर्षी वर्धा नदीत आलेल्या पुरामुळे वणी तालुक्यात हाहाकार माजला होता. वणी वरोरा नागपूर मार्गावर पाटाळा येथील पुल पाण्याखाली गेल्याने तीनदा वणी नागपूर मार्गावर वाहतूक बंद करण्यात आली होती.

गुरुवारी वर्धा नदीत आलेल्या पुरामुळे पाटाळा पुलाजवळ असलेले वेदा बार अँड रेस्टॉरंटचा पहिला मजला पाण्याखाली गेला आहे. नदीवर तयार करण्यात आलेल्या नवीन पुलावरून वाहतूक सुरू आहे. तर नदी काठावरील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली बुडाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा अंदाज आहे. पुरामुळे अद्याप कुठंही अप्रिय घटना घडली नसल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली आहे.

Comments are closed.