माजी नगराध्यक्ष व सुप्रसिद्ध व्यावसायिक सतिशबाबू तोटावार यांचे निधन

7 दिवसापासून सुरू मृत्यूशी झुंज संपली, आज वणी येथील मोक्षधाममध्ये अंत्यसंस्कार

जितेंद्र कोठारी, वणी: वणी नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष व शहरातील प्रसिद्ध कोळसा व्यावसायिक सतिशबाबू तोटावार यांचे शुक्रवार 27 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 वाजता निधन झाले. ते 58 वर्षांचे होते. शहरात ते ‘जिजाजी’ नावाने सुपरिचित होते. त्यांच्या निधनामुळे राजकीय व सामजिक क्षेत्रातून शोकसंवेदना व्यक्त केल्या जात आहे. 1996-97 या काळात त्यांनी वणी नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद भूषवले होते. सतिशबाबू यांच्या पार्थिवावर वणी येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 

प्राप्त माहितीनुसार 22 ऑगस्ट रोजी सकाळी सतिशबाबू यांना ह्रदयविकाराचा धक्का आला होता. वणी येथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना नागपूर येथील डॉ. अर्नेजा यांच्या दवाखान्यात त्यांना उपचारासाठी हलवण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर अंजियोप्लास्टी ऑपरेशन करण्यात आले. मात्र सर्जरीनंतर त्यांना ब्रेन हॅमरेजचा आघात होऊन ते कोमात गेले. त्यानंतर कुटूंबियांनी त्यांना प्रख्यात न्यूरॉलॉजिस्ट डॉ. निलेश अग्रवाल यांचे न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथील तज्ञ डॉक्टरांच्या चमूने सतीश बाबू याना वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र शुक्रवारी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

प्रसिद्धीचा हव्यास नसलेले दानशूर पडद्याआड
सतीशबाबू तोटावार यांची एक दानशूर व्यक्ती म्हणून ही शहरात ओळख होती. मात्र त्या मदतीच्या प्रसिद्धीचा त्यांना थोडाही हव्यास नव्हता. शेकडो गरजुंना त्यांना मदत केली मात्र त्याची कुठे ही वाच्छाता करू नये असे ते मदत करणा-यांना आवर्जून सांगायचे. अनेक सामाजिक संघटना, धार्मिक संघटना यांना त्यांना मदत केली. असे म्हटले जायचे की सतीशबाबू यांच्याकडे मदतीसाठी गेलेला व्यक्ती कधीही रिकाम्या हाताने परत गेला नाही.

‘जिजाजी’ नावाने शहरात सुपरिचित
सतिशबाबू तोटावार हे वणी येथील प्रख्यात कोळसा व्यावसायिक स्व. मदन पुनियाला यांचे जावई होते. त्यामुळे वणी शहरात ते ‘जिजाजी’ या नावाने ओळखले जायचे. वणीत सर्वात मोठे कोळसा व्यावसायिक म्हणून त्यांचा नावलौकिक होता. मॉर्निंगवॉक व व्यायाम त्यांच्या दैनंदिनी जीवनाचा अविभाज्य भाग होता.

पक्षावर सच्चा प्रेम करणारा कार्यकर्ता हरपला: वामनराव कासावार
काँग्रेसचा एक सच्चा कार्यकर्ता व पक्षावर प्रेम करणारा कार्यकर्ता हरपला आहे. काँग्रेससाठी हे मोठे नुकसान आहे. ते प्रसिद्धीपासून कायम दूर राहायचे. नगराध्यक्ष पदी त्यांना जास्त वेळ मिळाला नाही. मात्र असे असतानाही त्यांचा कार्यकाळ यशस्वी होता. त्यांच्या निधनाने पक्षाचे नुकसान झाले आहे.
– वामनराव कासावार, माजी आमदार

सतिशबाबू तोटावार यांच्या असामायिक निधनामुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलं, नातू तसेच आप्त कुटुंबीय आहे. त्यांच्यावर वणी येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.