शौचास गेलेल्या मुलीला फूस लावून पळवले, मुलीवर अत्याचार

भास्कर राऊत, मारेगाव: शौचास गेलेल्या एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्या प्रकरणी व तिच्यावर अत्याचार केल्या प्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मारेगाव तालुक्यात ही घटना घडली. मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे समोर आले. रविवारी रात्री या जोडप्याला वणी तालुक्यातील मेंढोली येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. 

सविस्तर वृत्त असे की पीडिता (17) ही तालुक्यातील एका गावात राहते. मुलगी शनिवारी दिनांक 11 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास शौचास गेली होती. मात्र बराच वेळ होऊन मुलगी घरी परतली नाही. त्यामुळे त्यांनी मुलीला कॉल केला. मात्र तिचा मोबाईल बंद आढळून आला. पालकांनी आजूबाजूला व मैत्रिणीकडे याबाबत चौकशी केली. मात्र तिचा शोध लागला नाही. दरम्यान मुलीचे एका तरुणासोबत प्रेम प्रकरण असल्याची माहिती पालकांना मिळाली.

रात्री उशिरापर्यंत मुलीचा पत्ता न लागल्याने मुलीच्या वडिलांनी मारेगाव पोलीस ठाणे गाठले. मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीनी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार त्यांनी दाखल केली. मारेगाव पोलिसांनी शोध घेतला असता त्यांना मुलीचे संदीप परशुराम धुर्वे (28) नामक एका तरुणाशी प्रेम प्रकरण असल्याची माहिती मिळाली. तांत्रिक मदत घेऊन मुलीचा शोध घेतला असता त्यांना सदर जोडपे हे वणी तालुक्यातील शिरपूर जवळील मेंढोली येथे असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाने तात्काळ मेंढोलीला जात रविवारी रात्री या जोडप्याला ताब्यात घेतले.

मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता मुलीने संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. शनिवारी दिनांक 11 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास मुलगी शौचास गेली होती. दरम्यान मुलीची वाट आरोपी संदीपने रोखली व तिला बोलण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवले. तिला घेऊन तो थेट वणीत आला. तिथून तो मेंढोली येथे मुलीला घेऊन गेला व मुलीवर अत्याचार केला, तसेच गावातही आरोपीने अनेकदा बलात्कार केला, अशी माहिती तिने पोलिसांना दिली.

अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी पोलिसांनी आरोपी संदीप धुर्वे याच्यावर भादंविच्या कलम 376, 376(1)(A), 376(2) (N) व पोक्सो (बाल लैंगिक अत्याचार संरक्षण) कायद्या नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा: 

दारु पिण्यास पैसे न दिल्याने काठीने बेदम मारहाण

Comments are closed.