राजूर धम्मपरिषदेत रविवारी धम्मसंवाद आणि प्रबोधन
महेश लिपटे, राजूरः येथे 61 व्या धम्मदीक्षा सोहळादिन समारंभानिमित्त आयोजित धम्मपरिषदेचे शनिवारी उद्घाटन झाले. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत धम्मसंवाद होणार आहे. ‘‘ सांस्कृतिक दहशदवादाच्या आणि धार्मिक मूलतत्त्ववादाच्या काळात बुद्ध-आंबेडकर विचारांनी समाज घडू शकतो’’ या विषयावर पहिल्या सत्रात धम्मसंवाद होणार आहे. या धम्मसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक यवतमाळ येथील आनंद गायकवाड राहतील. नागपूर येथील भैयाजी खैरकार, पुष्पा बौद्ध, मंुबई येथील डॉ. परमानंद, भद्रावती येथील अॅड. भूपेंद्र रायपुरे उपस्थितांना मार्गदर्शन करतील.
धम्मसंवादाचे दुसरे सत्र दुपारी 2.30 ते 5.00 पर्यंत चालेल. ‘‘साक्षरता म्हणजे माणसाच्या नव्या जाणीवेची पहाट’’ या विषयावर हा धम्मसंवाद होईल. या धम्मसंवादाच्या अध्यक्षस्थानी धर्मराज निमसरकर राहतील. नागपूर येथील डॉ. नीलिमा चव्हाण, प्रा. जावेद पाशा, चंद्रपूर येथील प्रा. दिलीप चौधरी उपस्थितांना मार्गदर्शन करतील.
सायंकाळी 6 ते 10 वेळात प्रबोधनात्मक कार्यक्रम होतील. यात नांदेड येथील ख्यातनाम भीमशाहीर तथा प्रबोधनकार व आनंद कीर्तने आणि संच कार्यक्रम सादर करतील. रविवारी आणि सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची विनंती आयोजकांनी केली आहे.