डॉ. अनिल कुळकर्णी यांचा सर्पदंशाने मृत्यू
मनमिळाऊ डॉक्टरांच्या अकस्मात मृत्यूने हळहळ
सुशील ओझा, झरी: वणी येथील डॉ. अनिल कुळकर्णी यांचा शुक्रवारी सर्पदंशाने मृत्यू झाला. ही घटना झरी येथे घडली. डॉ. कुळकर्णी यांचा दवाखाना झरी तालुक्यातील पाटण येथे आहे. शुक्रवारी पाटण येथे सर्पदंश झाल्याने त्यांना उपचारासाठी झरी येथे हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. मनमिळाऊ स्वभाव आणि मनोभावे सेवा देणारे डॉ. कुळकर्णी यांच्या अकस्मात मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.
डॉ. कुळकर्णी पाटण येथे 35 वर्षांपासून निस्वार्थ सेवा करीत होते. सायंकाळी ७ वाजता दरम्यान दवाखान्यातील वर ठेवलेला खोका काढण्याकरिता त्यांनी हात टाकला. तेव्हा हाताच्या बोटाला विषारी सापाने घट्ट पकडून चावा घेतला. बोट पकडून बसला. हात बाहेर काढला असता अर्धा ते एक फूट साप बोटासोबत बाहेर आला. हात झटकून बोटाला सोडविले.
दवाखान्याला लागून असलेल्या मेडिकलमध्ये जाऊन साप चावल्याने सांगितले. डॉ. कुळकर्णी यांना त्यांच्या मित्रांनी घेऊन झरी येथील दवाखान्यात नेले. वाटेत ते सर्वांसोबत बोलत गेले. घरच्या मंडळींनासुद्धा फोन करून साप चावल्याने सांगितले. घाबरू नका काहीच होत नाही असे बोलले.
डॉ. कुळकर्णी यांचा दवाखाना १५ दिवस बंद होता. सुमारे ८ ते १० दिवसापूर्वी ते पाटणला आले होते. दवाखान्याच्या बाजूला खूप कचरा साचलेला होता. त्या कचऱ्यातीलच साप दवाखान्यात घुसल्याची चर्चा होती. दवाखाना बंद करून मित्राच्या घरी जेवायला जायची तयारी होती.
दवाखान्यात पोहचताच पाच मिनिटांतच डॉ यांची जीभ जड झाली. बोलता येत नव्हतं व दोन झटके येऊन त्यांचा मृत्यू झाला. दवाखान्यात जातांना सर्वांशी चांगले बोलत गेले. दवाखान्यातील सापाने चावल्याची संपूर्ण घटना सांगितली.या घटनेने त्यांच्या मित्रांसह सर्वांना मोठा झटका बसला. गोरगरीब जनतेवर पैसे असोत अथवा नसोत ते निस्वार्थ भावनेने उपचार करीत. परिसरातील शेकडो लोकांची गर्दी नेहमी दवाखान्यात असायची. विविध सामाजिक संघटनांमध्ये त्यांचा सहभाग होता. सापाने चावा घेऊन त्यांच्या मृत्यूची वार्ता पसरताच पाटण व परिसरातील शेकडो लोकांनी एकच गर्दी केली.