अॅड. ए. डी. उर्फ अनंत दिगंबर देशपांडे यांचे निधन

विविध संस्थांमध्ये होते मोलाचे योगदान, आमदार, विधिज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रतिक्रिया

0

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: अॅड. ए. डी. उर्फ अनंत दिगंबर देशपांडे (72) यांचे शनिवारी पहाटे 4च्या सुमारास निधन झाले. ते आजारी असल्याने त्यांच्यावर यवतमाळ येथे उपचार सुरू होते. दुपारनंतर त्यांच्यावर यवतमाळ येथे अंतिम संस्कार होतील. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंड, तीन भाऊ आणि तीन बहिणी असा मोठा आप्तपरिवार आहे. आमदार, विधिज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त केल्यात.

स्थानिक शिक्षण प्रसारक मंडळ आणि बार कॉन्सीलचे ते अध्यक्ष होते. विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमात त्यांचं मोलाचं योगदान होतं. वकीली क्षेत्रात काम करणाऱ्या नव्या पिढीचे ते उत्कृष्ट मार्गदर्शक होते. त्यांचा व्यापक जनसंपर्क होता. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

शोकसंवेदना

त्यांच्या जाण्याने खूप मोठा धक्का बसला. गेल्या 30 ते 35 वर्षांपासून त्यांच्यासोबत अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. ते वणीचे वैभव होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक छटा होत्या. शिक्षण आणि विधीक्षेत्रात त्यांचा लौकिक होता. भरीव कामगिरी होती. व्यक्तिगत, परिवार आणि विधानसभेच्या वतीने त्यांना आदरांजली.

  • संजीवरेड्डी बोदकुरवार,
    आमदार, वणी विधानसभा

अतिशय कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व होतं त्यांचं. ते अत्यंत शिस्तप्रिय होते. सर्वांशीस ते प्रेमाने वागत. संस्थेच्या कामात ते स्वत:ला झोकून देत. त्यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळालं.

अशोक सोनटक्के
सहसचिव, शिक्षण प्रसारक मंडळ, वणी

ते खूप धार्मिक होते. गेल्या काही काळापासून शेगावची नियमित वारी करायचे. नवरात्रात विविध शक्तिस्थळांना आवर्जून जात. ते शंकर आणि दत्ताचे उपासक होते. त्यांच्या घरीदेखील त्यांनी दत्तमूर्तीची स्थापना केली होती.

-माधव सरपटवार
अध्यक्ष, श्री जैताई देवस्थान, वणी

बार कॉन्सिलचे अध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द दिमाखदार होती. नव्या पिढीचे उत्तम मार्गदर्शक होते. ते जेष्ठ वकील होते. तरीदेखील त्यांनी कधीच अहंकार बाळगला नाही. न्यू जनरेशनसोबतदेखील संवाद करताना त्यांनी कधीच जेष्ठत्वाचा आव आणला नाही. ते अत्यंत प्रेमळ होते. सर्वांशी आपुलकीने वागायचे.

-अॅड. गणेश नीत,

विधिज्ञ, वणी

Leave A Reply

Your email address will not be published.