अल्पावधीत लोकप्रियता, मात्र अचानक ठाणेदारांची बदली
जितेंद्र कोठारी, वणी: वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पीआय प्रदीप शिरस्कर यांची अकोला येथे बदली झाली आहे. जिल्ह्यात विहित कालावधी पूर्ण केलेल्या निःशस्त्र पोलीस निरीक्षक दर्जांच्या अधिकाऱ्यांची बदलीचे आदेश नुकतेच निघाले आहे. फक्त 6 महिन्याच्या अल्प कालावधी प्रदीप शिरस्कर यांना मिळाला. या कालावधीत शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी, अवैध धंदे राजरोसपणे सुरू असताना त्यांनी कठोर पावलं उचलत त्यावर कार्यवाही करण्यास सुरूवात केली होती. मात्र बदलीचे आदेश आल्याने त्यांचे कार्य अपूर्ण राहीले. आता वणीच्या ठाणेदारपदी कोणाची वर्णी लागणार याच्या कडे सर्वांचे लक्ष आहे.
पीआय शाम सोनटक्के व पीआय रामकृष्ण महल्ले यांचा कार्यकाळ प्रचंड निराशाजनक राहिला. घरफोडी, अवैध धंदे यावर अंकुश बसवण्यास या दोन्ही ठाणेदारांना अपयश तर आलेच, उलट ‘राम-शाम’ यांच्या कार्यकाळात या घटना वाढल्या. प्रदीप शिरस्कर यांना अल्प कालावधी मिळाला असला तरी आधीच्या दोन ठाणेदारांपेक्षा त्यांचा ग्राफ वर राहिला. शिरस्कर यांनी डीबी पथक ऍक्टीव्ह केले होते. घरफोडी, सेक्स रॅकेट, वाहनचोरी, मटका इत्यादींवर त्यांनी आता कुठे कामाला सुरूवात केली होती, मात्र अचानक त्यांची बदली झाली. मात्र या अल्प काळातच त्यांनी अनेक नवीन विषय उचलले.
अट्टल गब्याला अटक
सोनटक्के आणि महल्ले यांच्या कार्यकाळात शहरातील घरफोडीने उच्चांक गाठला. बंद घर म्हणजे घरफोडी हे एक समीकरण बनलं होतं. पहिल्यांदाच चोरट्यांनी मुख्य रस्त्यावरील दुकाने फोडणे सुरू केले. त्यामुळे सर्वासामान्यांसह व्यापारी देखील त्रस्त झाले होते. ठाणेदार शिरस्कर यांच्या काळात चोरीच्या घटनांमध्ये विशेष अशी कमी आली नसली, तरी गब्या या अट्टल चोरट्यास अटक करण्यात त्यांना यश आले. असे म्हटले जायचे की शहरातील अधिकाधिक घरफोडींमध्ये गब्याचा हात आहे. चोरीच्या उद्देशाने घरात शिरून एका पत्रकारावर हल्ला केल्या प्रकरणी गब्या फरार होता. या वन मॅन आर्मी गब्याच्या नागपूरहून मुसक्या आवळण्यात आल्या. तसेच शहरातील एका सराफा व्यावसायिकाकडून दागिने लुटून मागील एका वर्षापासून पोलिसांच्या हाती न लागणा-या दोन आरोपींना उत्तरप्रदेशच्या प्रतापगढ जिल्ह्यातून अटक करण्यात आली.
सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
वणी शहरात मोठ्या प्रमाणात सेक्स रॅकेट सुरू आहे. याबाबत वणीकरांनी अनेकदा ठाणेदारांकडे तक्रार देखील केली होती. मात्र प्रत्येक ठाणेदारांनी त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी हे सेक्स रॅकेट इतके वाढले की अनेक बाहेरगावातील तरुणी, महिला वणीत येऊ लागल्या. यावर कोणीही कारवाई करत नसल्याने रेक्स रॅकेट चालक व दलालांना एक ‘प्रोटेक्शन’ मिळाले. एक सेफ जागा म्हणून वणी शहराची ओळख निर्माण झाली. त्यामुळे नागपूर, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यातून महिला व तरुणी देहविक्रीसाठी वणीत यायच्या. तीन दिवसांआधीच ठाणेदार शिरस्कर यांच्या मार्गदर्शनात पहिल्यांदाच वणीत सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. शहरातील ही घाण साफ करणार असे वचन देऊन त्यांनी नागरिकांना याविषयी माहिती देण्याचे आवाहन देखील केले होते. शिरस्कर यांची बदली झाल्याने सेक्स रॅकेट चालवणा-यांचे चांगलेच फावले आहे.
गांजा ओढणा-यांवर कारवाई
शहरातील अनेक निर्जन ठिकाणी, बांधकाम सुरु असलेल्या साईटवर, नदी काठी, मोकळे मैदान व बगिचे इत्यादी ठिकाणी गर्दुल्यांचा वावर वाढला होता. अशा गर्दुल्यांवर त्यांनी कारवाईचा सपाटा लावला. गांजाच्या आहारी गेलेल्या अनेकांना त्यांच्या पथकाने धाड टाकून त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे गर्दुल्यांमध्ये एक प्रकारचा धाक निर्माण झाला होता. विशेष म्हणजे शहरातील चेन स्नॅचिंगच्या घटनेत देखील कमी झाल्या.
तक्रार निवारण दिनाची सुरूवात
लोकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी त्यांनी पहिल्यांदाच तक्रार निवारण दिन (जनता दरबार) सुरू केला होता. शनिवारी सर्वसामान्य नागरिकांना आपल्या तक्रारी मांडण्याची एक चांगली संधी त्यांनी उपलब्ध करून दिली होती. शिवाय विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमातही वणी पोलीस ठाणे सहभागी होताना दिसत होते. विशेष म्हणजे पोलीस स्टेशनच्या आवारात आयोजित रक्तदान शिबिरात विक्रमी 1111 नागरिकांनी रक्तदान केले होते.
वैभव जाधव यांची बदली झाल्यानंतर पीआय शाम सोनटक्के यांना वणी महिन्याभरासाठी पोलीस ठाण्याचा प्रभार मिळाला होता. त्यानंतर ऑक्टोबर 2021 मध्ये ते ठाणेदार पदी रुजू झाले. मात्र त्यांना अवैध मटका प्रकरण भोवले व अवघ्या 6 महिन्यातच त्यांची उचलबांगडी झाली. त्यानंतर पीआय रामकृष्ण महल्ले यांनी ठाणेदार पदाचा पदभार स्वीकारला. मात्र कर्तव्यात हयगय केल्या प्रकरणी पो. नि. रामकृष्ण महल्ले यांची बदली करण्यात आली. डिसेंबर 2022 मध्ये प्रदीप शिरस्कर यांना वणी पाठविण्यात आले. फक्त 6 महिन्याच्या अल्प कालावधी प्रदीप शिरस्कर यांना मिळाला.
शहरात गांजा पोहोचवणारा मुख्य डिलर, शहरात सुरू असलेले अनेक सेक्स रॅकेट, केवळ मटका घेणा-यांवर कारवाई सुरू असली तरी मोठे मासे मात्र कारवाईपासून सुटले. शहरात सुरू असलेली बेटिंग असे अनेक विषय अद्यापही कायम आहे. शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी, अवैध धंदे राजरोसपणे सुरू असताना त्यांनी कठोर पावलं उचलत त्यावर कार्यवाही करण्यास सुरूवात केली होती. मात्र बदलीचे आदेश आल्याने त्यांचे कार्य अपूर्ण राहीले.
हे देखील वाचा:
Comments are closed.