रिंगणचे संपादक सचिन परब यांना संत चोखामेळा पुरस्कार

संतप्रेमी आणि साहित्यप्रेमींकडून सदिच्छांचा वर्षाव

0

श्रीनाथ वानखडे, आळंदी– श्री संत मोतीराम महाराज संस्थानच्या वतीने दरवर्षी आषाढी वारीनिमित्त संत साहित्य आणि संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्यांना पुरस्कार देण्यात येतात. या वर्षीचा संत चोखामेळा पुरस्कार रिंगणचे संपादक ह.भ.प. सचिन परब यांना प्रदान करण्यात येणार आहे.

परब यांच्या सोबतच ह.भ.प. अच्युत महाराज दस्तापुरकर यांना संत मोतीराम महाराज पुरस्कार, विदर्भरत्न भागवताचार्य गजानन महाराज कावरखे यांना संत तुकाराम पुरस्कार, ह.भ.प. पुरुषोत्तमदादा पाटील महाराज यांना संत एकनाथ पुरस्कार, ह.भ.प.श्यामसुंदर महाराज सोन्नर यांना संत सावतामाळी पुरस्कार, ह.भ.प. बाळासाहेब मोकाशी यांना संत सेना महाराज पुरस्कार, ह.भ.प. दिनकरशास्त्री भुकेले महाराज यांना संत ज्ञानेश्वर महाराज पुरस्कार, परमपूज्य ह.भ.प. लक्ष्मण महाराज मेंगडे यांना संत नामदेव पुरस्कार, ह.भ.प. सौ. रूपालीताई रोहिदास जाधव यांना संत जनाबाई पुरस्कार, ह.भ.प. श्रीहरीदेऊ लाड महाराज यांना संत गोरोबाकाका पुरस्कार, ह.भ.प. गणेश शिंदे यांना संत नरहरी सोनार पुरस्कार घोषित झाले आहेत.

सचिन परब हे सन 2012 पासून संतांना समर्पित रिंगण नावाने आषाढी एकादशीला विशेषांक काढत आहेत. आतार्पंत रिंगणचे संत नामदेव, संत विसोबा खेचर, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत निवृत्तीनाथ, संत गोरा कुंभार विशेषांक प्रकाशित झाले आहेत. संतांचे कार्य, त्यांचे विचार रिंगण या वार्षिकांकाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहचत आहेत. या वर्षी आषाढी एकादशी २०१९ला रिंगणचा संत सावता माळी विशेषांक येत आहे.

अनेक माध्यमांचे दिवाळी अंक निघतात. पंढरपुरातील आषाढी एकादशीचा महोत्सव संपूर्ण जगभर चर्चेत असतो. या उत्सवानिमित्त विशेषांक काढण्याची परंपरा सचिन परब यांनी सुरू केली. अंकाचं प्रकाशन पंढरपुरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असतं. रिंगणला समाजीतील सर्व वारकरी, साहित्यप्रेमी, संतप्रेमी भरभरून सहकार्य करीत असतात.

संत मोतीराम महाराज संस्थान, साखरे मठाजवळ, इंद्रायणी काठी देवाची आळंदी येथे दिनांक 25 जून रोजी सकाळी 10 वाजता हा पुरस्कार प्रदान सोहळा होईल. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी 89 व अखिल भारती मराठी सहित् संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस राहतील. पुणेचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि पंच आग्नेय आखाडा भारतचे ह.भ.प. लोकेश चैतन्य महाराज यांच्या हस्ते हे पुरस्कार दिले जातील.

यावेळी शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष विनायक मेटे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, पुणेचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, खासदार मा. बंडू जाधव हे सोहळचे प्रमुख पाहुणे असतील. पुण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, मा.आ. विलास लांडे, कृषी संचालक पांडुरंग शिगेदार, आळंदीच नगराध्यक्ष वैजंती उमरगेकर, मोतीराम महाराज संस्थानचे अध्यक्ष गिरीधर काकाणी यांच्या सन्माननीय उपस्थितीत हा सोहळा होईल. या सोहळ्याला उपस्थित राहण्याची विनंती निमंत्रक मंचकराव पौळ, संभाजीराव पौळ, विठ्ठल कदम, मारूती अवरगंड यांनी केली आहे. सचिन परब यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल रिंगणचे सुनील इंदुवामन ठाकरे, श्रीनाथ वानखडे, नितीन चौधरी, प्रदीप पाटील, अतुल विडुळकर, वणी बहुगुणी न्यूज पोर्टलचे संपादक निकेश जिलठे यांनी अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.