पुरुषोत्तम नवघरे, वणी: भारतात सर्वच विद्यापीठांचा युवा महोत्सव होतो. हजारोे विद्यार्थी आपल्या कलागुणांचं प्रदर्शन करतात. यात विविध स्पर्धा होतात. यात भेदभाव होत असल्याची शंका विद्यार्यांमध्ये असते. मात्र यापुढं असं होणार नाही. कारण हा मुद्दा राज्यपाल नामीत सिनेट सदस्य गजानन कासावार यांनी लक्षवेधी द्वारे उचलून वर्षानुवर्षे असाच अन्याय सुरू असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. या गंभीर बाबीची नोंद घेऊन विद्यार्थी विकास मंडळाच्या माध्यमातून याबाबीचे निराकरण करण्यात येणार असल्याची ग्वाही कुलगुरूंनी दिली.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे यावर्षीचा युवा महोत्सव बडनेरा येथे झाला. या महोत्सवात 81 परितोषिकांपैकी 71 पारितोषिके केवळ अमरावती जिल्ह्यातील महाविद्यालयामध्ये एकवटली. उर्वरित 10 पारितोषिके या विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या चार जिल्ह्यांमध्ये विभागली गेलीत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाद्वारा या वर्षी प्रो. राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेकॅनॉलॉजी अँड रिसर्च बडनेरा येथे हा युवा महोत्सव झाला. यात 27 प्रकारांमध्ये विद्यार्थी सहभागी होऊन 5 जिल्ह्यांतील महाविद्यालयांनी भाग घेतला होता.
दरवर्षी अमरावती परिसरातच हा महोत्सव होत असल्यामुळे आयोजकांसह अमरावती जिल्ह्याचा या आयोजनावर प्रभाव असतो. सभागृहात या संदर्भात झालेल्या चर्चेनुसार युवा महोत्सवाची तयारी करण्यासाठी बाहेरून प्रशिक्षक घेतले जातात. हे प्रशिक्षक या महोत्सवात परीक्षक असू नयेत असा नियम आहे. पण या नियमाला अनेकदा डावलले जाते. त्यामुळे निर्णयावर परिणाम होतो. त्यामुळे अमरावती व्यतिरिक्त अन्य महाविद्यालयाच्या चांगल्या प्रदर्शनांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे 90 टक्के बक्षिसे अमरावती जिल्ह्यातच जातात. हा मुद्दा गजानन कासावार यांनी प्रकर्षाने लावून धरल्यामुळे हा विषय सल्लागार समितीपुढे सादर करण्यात येणार असल्याचे सभाध्यक्ष कुलगुरूंना जाहीर करावे लागले.
लक्षवेधी द्वारे चार जिल्ह्यातील कालावंतावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडल्यामुळे यापुढे 90 टक्के बक्षिसे एकट्या अमरावती जिल्ह्याला मिळणार नाही. असा विश्वास गजानन कासावार यांनी व्यक्त केला. युवा महोत्सव हा विद्यार्थ्यांचा जवळचा विषय आहे. यावर नेमकं काय होईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.
Comments are closed.