लोकलमध्ये तरुणीसमोर अश्लिल चाळे
हेल्पलाईननं उडवली होती तरुणीची खिल्ली, रेल्वेमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
मुंबई: लोकलचा प्रवास सुरक्षीत म्हणून लोकलनं प्रवास करण्याला प्राधान्य दिलं जातं. मात्र लोकलमध्येही अनेकदा महिलांवर हल्ला होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. यातच आता महिलेचा विनयभंग होण्याची घटना देखील समोर आली आहे. एका पीडितेने आपल्याला आलेला भयानक अनुभव चक्क ‘फेसबुक’वर पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये तिने तिचा विनयभंग केलेल्या तरुणाचे छायाचित्रही अपलोड केले आहे. तिला फेसबुकवर याची वाच्यता करावी लागली, कारण तक्रार करायला गेल्यावर रेल्वे हेल्पलाइनच्या कर्मचार्यांनी तिचीच हसून खिल्ली उडवली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंडला राहणारी २२ वर्षीय तरुणी दुपारी २ च्या सुमारास बोरीवली-चर्चगेट ट्रेनने प्रवास करत होती. महिलांकरता असलेल्या नवव्या डब्यात ती बसली होती. सोबत सहा महिला प्रवासी होत्या. शेजारच्या अपंगांच्या डब्यातून प्रवास करणारा एक इसम तिच्याकडे नजर रोखत तिला शिवी देत होता. त्याने नंतर तिच्याकडे रोखून पाहत तिच्यादेखतच पँटची झिप उघडून हस्तमैथुन करायला सुरुवात केली. ट्रेन कांदिवलीला येताच तो अपंगांच्या डब्यातून उतरून महिलांच्या डब्याच्या दिशेने येऊ लागला. अन्य सहप्रवासी महिलांनी आरडाओरडा केला. त्याने तिच्यावर बलात्कार करण्याची धमकी दिली. महिलांच्या आरडाओरड्याने तो पळून गेला.
तिने ट्रेनमधूनच रेल्वेच्या महिला हेल्पलाइन विभागाला फोन लावला. तिने हेल्पलाइन कर्मचार्याला घडलेला प्रसंग सांगितला. ट्रेनची वेळ, ठिकाण सर्व सांगितले. पण तिचे बोलणे गांभीर्याने घेण्याऐवजी तो कर्मचारी तिच्यावर हसू लागला आणि त्याने फोन कट केला. तरुणाने केलेल्या विनयभंगाच्या प्रसंगाला खंबीरपणे तोंड दिलेली तरुणी रेल्वे हेल्पलाइन कर्मचार्याच्या वर्तनामुळे मात्र गोंधळली. या लिंगपिसाट पुरुषाचा आलेला अनुभव तिने फेसबुकवर शेअर केला. हा प्रसंग १५ जूनला घडला, मात्र तिने गुरुवारी तो पोस्ट केला.
पश्चिम रेल्वेचे पोलिस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तिचा फोन कोणी अटेंड केला ते शोधण्यासाठी रेल्वे हेल्पलाइनचे कॉल रेकॉर्ड तपासले जाणार आहेत.