टीचरला मिस्ड कॉल दिला की, ती विद्यार्थ्यांना ऐकविते छान छान गोष्टी
बोलकी बाहुली फेम शिक्षिका दीपाली बाभुळकर यांचा उपक्रम
जयंत सोनोने, अमरावती: लॉकडाऊनच्या काळात शिक्षण ऑनलाईन सुरू आहे. त्यातही नेटवर्क आणि अन्य अडचणी येतात. त्यातही विद्यार्थ्यांसाठी एक वेगळा प्रयोग जिल्हा परिषद शिक्षिका दीपाली बाभूळकर यांनी केला. या टीचरला साधा मिस्ड कॉल दिला की, विद्यार्थ्यांना छान छान गोष्टींसह, कविता आणि बरंच काही ऐकायला मिळतं. तेही अगदी मोफत आणि इंटरनेटशिवाय. ‘मिस कॉल’वर कथा, कविता व कादंबऱ्या ऐकण्याच्या वाचन समृध्दी वर्गाला महाराष्ट्रासह राज्यस्थान, छत्तीसगड, व एमपीतील विद्यार्थी हजेरी लावत आहेत. दीपाली बाभुळकर ह्या त्यांच्या बोलक्या बाहुल्यांसाठी प्रसिद्ध आहेत.
वाचाल तर वाचाल’ असा मंत्र सांगितला जातो, ते उगीच नाही. बौध्दिक आणि सामाजिक विकासासाठी ग्रंथ आणि ग्रंथालयांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोरोनाच्या शाळा – महाविद्यालय बंद असल्याने विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृतीचे बीज रुजवून विद्यार्थ्यांना समृध्द करण्याचा ध्यास घेत येथील जिल्हा परिषद शिक्षिका दीपाली बाभुळकर यांनी तंत्रज्ञान व मानसशास्त्रांची सांगड घालून ‘गोष्टी’ सांगत विद्यार्थ्यांना लिहिते केले.
स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रिसूत्रीचा केवळ उक्तीतून उद्घोष न होता ती कृतीतून प्रत्ययास आणण्याचे कार्य पुस्तकांच्या रूपाने होऊ शकते. आजच्या पिढीवर असे संस्कार करण्यासाठी पुस्तकांशिवाय दुसरे प्रभावी माध्यम नाही. कोरोनाची टाळेबंदी विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमांसह त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी परिस्थितीचे संधीत रूपांतर करत उपलब्ध माध्यमांचा सकारात्मक उपयोग करुन विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करत आहेत बाभुळकरसह राज्यातील प्रयोगशिल शिक्षक.
‘एक पाऊल वाचन समृद्धी’कडे अंतर्गत दररोज एक गोष्ट मुलांना ऐकण्यासाठी रेकॉर्ड केली जाते. लहान मुलांची दिनचर्चा कशी असावी, सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय करावे हा प्रश्न मुलांच्यासमोर आ वासून उभा असतो. ऑनलाईन अभ्यासमालिकेद्वारा ते अभ्यासपण करीत आहेत. पण आजच्या काळामध्ये त्यांच्या आनंदासाठी, मनोरंजनासाठी टि. व्ही शिवाय गोष्ट हा एकच सर्वात उत्तम पर्याय आहे. असा विचार करून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती येथे कार्यरत विषय सहायक दीपाली दिलीप बाभुळकर ह्या स्वलिखीत गोष्टींसह माधुरी पुरंदरे, राजीव तांबे, फारूक काझी, स्वाती राजे यांच्यासह बालसाहित्यातील नामांकित लेखकांची प्रत्यक्ष पूर्वपरवानगी घेऊन दररोज एक गोष्ट स्वतः च्या आवाजात रेकॉर्ड करून फेसबूक, व्हाॅट्सअप व गोष्टींचे विडीयो फेसबूक व युट्यूब आदी विविध सामाजिक माध्यमांचा सकारात्मक उपयोग करुन विद्यार्थ्यांना पाठवतात.
गोष्टीच्या सुरवातीला गोष्टीचे नाव, ती कोणत्या पुस्तकातून घेतली आहे, पुस्तकाचे लेखक, चित्रकार व प्रकाशक यांची माहिती मुलांना दिली जाते. यामाध्यमातून विद्यार्थी गोष्ट तर ऐकतातच; पण त्या गोष्टीसोबत त्या गोष्टीवर आधारित चित्र काढणे, यमक जुळवणे, वाचिक अभिनय, नवीन शब्दांचा संग्रह करणे असे उपक्रमसुद्धा घरबसल्या करीत आहेत. लहान वयात विद्यार्थ्यांची आकलनशक्ती अधिक असते. यांचा उपयोग करत विद्यार्थ्यांनी ‘पाऊस’ ही गोष्ट ऐकल्यानंतर पावसाचे चित्र काढणे, त्या परिस्थितीवर साधक-बाधक विचार करुन शब्दरचना करणे अशा गोष्टी करण्यासाठी मुल स्वयंस्फूर्तीने समोर येत असल्याचे चित्र आहे.
वाचनसंस्कृती लयाला जाते की काय अशी भीती वाटत असताना वडील दिलीप बाभुळकर यांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या उपक्रमामुळे टाळेबंदीत विद्यार्थ्यांमध्ये अनेक सकारात्मक बदल दिसून आले आहेत. ‘एक पाऊल वाचनसमृद्धीकडे’ या उपक्रमांतर्गत गोष्ट ऐकणारे विद्यार्थी आता स्वत: लिहू लागले आहेेत. रंगशाळा, स्टोरी टेलींग चॅलेंजमध्ये भाग घेऊन आतापर्यंत २६ विद्यार्थ्यांनी स्वता: कथा लिहून वाचन करुन ‘पॉडकास्ट’ केली आहे.
शिक्षीका बाभुळकरांपासून प्रेरणा घेऊन जिल्हा परिषदेतील शिक्षक असे प्रयोग करण्यासाठी समोर येत आहेत. त्यांना पुस्तकं, त्यांच्या पीडीएफ प्रती व लागणारी साहित्य व हाताळणी संदर्भात त्यांना बांभुळकर मदत करत आहेत. कोरोनामुळे शैक्षणिक क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहे. मराठी व सरकारी शाळांचा ‘दर्जा’वर नेहमीच प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते. मात्र महामारीच्या प्रतिकुल काळात शैक्षणिक मंदीत संधी शोधून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांचे जीवन समृध्द करणारे कार्य कौतुकास्पद आहे.
रोज एक गोष्ट….
महाराष्ट्रातील राज्यस्तरीय व्हाट्सअप ग्रुपवर दररोज ऑडिओ क्लिपद्वारे गोष्टी पोस्ट केल्या जातात. मग ती गोष्ट शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना पाठवतात. या पद्धतीने दररोज हजारो विद्यार्थी गोष्टीचा आनंद घरबसल्या घेत आहेत. याशिवाय वाचन कसे करावे? गोष्ट सांगताना आरोह-अवरोह कसा असावा? याचेसुद्धा धडे मुले गिरवीत आहेत. ‘वल्लरी’चा वाचन कट्टा व्हाट्सअॅप ग्रुपला महाराष्ट्रभरातील अनेक विद्यार्थी स्वत: लिहिलेली गोष्ट दररोज अपलोड करीत आहे. आतापर्यंत मराठी व हिंदी भाषेतून ७० हजार विद्यार्थी या उपक्रमांत सहभागी झाले आहेत. तर १४ हजार ५०० मुलांनी टोल फ्री क्रमांकावरुन गोष्टी ऐकल्यात. यामुळे विद्यार्थ्यांमधील कल्पनाशक्ती व प्रतिभेला वाव मिळत आहे.
दीपाली बाभुळकर, उद्योगशील शिक्षिका
ऑनलाईन शिक्षणांचा रथ सुसाट होत असतानाच त्यातील अनेक उणिवा अडचणीच्या ठरत आहेत. कुठं स्मार्ट फोन नाही तर कुठ ंनेटवर्क, कुणाला डेटा परवडणारा नाही, तर कुठं विजेची अडचण असताना विद्यार्थ्यांच्या शिक्षणांत व्यत्यय येऊ नये याकरिता कैवल्य फाऊंडेशनच्या व्हि. एस. एफ. उपक्रमांतर्गत टोल फ्री क्रमांक १८०० ५७२ ८५८५ द्वारे मुलांपर्यंत गोष्टी पोहोचल्या जात आहेत. कुठल्याही मोबदल्याशिवाय मोफत गोष्ट ऐकणे मुलांना शक्य झाले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून दररोज हजारो विद्यार्थी लाभ घेत आहेत.