मिताली राजला मिळणार BMW कार
धडाकेबाज कामगिरीनं मितालीनं भारतीय महिला संघाला पोहचवलं होतं फायनलमध्ये
नवी दिल्ली: जरी भारतीय महिला क्रिकेट टीम वर्ल्डकपच्या फायनलमधे पराभूत झाली, तरी देशभरातून महिला संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक चर्चेत आलेली महिला खेळाडू म्हणजे मिताली राज. तिला महिला संघाची सचिन तेंडुलकर म्हटलं जातंय.
वर्ल्डकप दरम्यान आपल्या शानदार प्रदर्शनाच्या जोरावर कॅप्टन मिताली राजने टीमला फायनल मॅचपर्यंत धडक मारली. इतकेच नाही तर वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स करण्याचा रेकॉर्डही मितालीने रचला. मिताली राजने केलेल्या या कामगिरीमुळे आता तिला लवकरच एक BMW कार गिफ्ट मिळणार आहे.
ज्युनिअर क्रिकेट निवड समितीचे माजी अध्यक्ष आणि तेलंगणा बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष चामुंडेश्वरनाथ यांनी मितालीला एक ब्रँड न्यू BMW कार देण्याची घोषणा केली आहे. चामुंडेश्वर यांनी यापूर्वीही काही खेळाडूंना कार भेट दिल्या आहेत. आपल्या याच कामाला आणखीन पूढे वाढवत चामुंडेश्वरनाथ यांनी मिताली राजने केलेल्या जबरदस्त कामगिरीमुळे कार गिफ्ट करण्याचं म्हटलं आहे.
यापूर्वी म्हणजेच 2007 साली चामुंडेश्वरनाथ यांनी मिताली राजला शेवरेलो गिफ्ट केली होती. मिताली राजसोबतच चामुंडेश्वरनाथ यांनी पी. व्ही सिंधू आणि साक्षी मलिक यांनी ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकल्यानंतर कार गिफ्ट केली होती. या दोघींना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या उपस्थितीत कार गिफ्ट केली होती. वर्ल्डकप दरम्यान मिताली राजने वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.