पाकिस्तान म्हणजे पाठीत खंजीर खुपसणारा मित्र

अमेरिकेची पाकिस्तानवर जळजळीत टीका

0 809

वॉशिंग्टन: पाकिस्तान हा पाठीत खंजीर खुपसणारा मित्र असल्याची घणाघाती टीका अमेरिकेचे सिनेटर टेड पो यांनी केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून टेड पो यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. अमेरिकेने काही दिवसांपूर्वीच दहशतवाद्यांविरोधात करण्यात येणार्‍या कारवाईसाठी पाकिस्तानला दिला जाणारा निधी रद्द केला. याच पार्श्‍वभूमीवर अमेरिकेचे सिनेटर टेड पो यांनी ‘पाकिस्तान म्हणजे पाठीत खंजीर खुपसणारा मित्र’ असल्याची टीका करत पाकिस्तानवर जोरदार टीका केली.

पाकिस्तानकडून दहशतवाद्यांविरोधात पुरेशी कारवाई केली जात नसल्याचे अमेरिकेच्या निदर्शनास आले. त्यामुळेच अमेरिकेने दहशतवादविरोधी कारवाईसाठी पाकिस्तानला दिला जाणारा निधी रद्द केला. मागील आठवड्यात अमेरिकेकडून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. अमेरिकेचे संरक्षण सचिव जेम्स मॅट्टिस यांनी याबद्दलची घोषणा केली होती. मॅट्टिस यांच्या निर्णयाचे टेड पो यांनी स्वागत केले आहे. पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना सहकार्य केले जाते, अशी भूमिका याआधीही पो यांनी वारंवार मांडली आहे.

पाकिस्तानकडून दहशतवादाला खतपाणी घातले जाते, या आपल्या भूमिकेचा टेड पो यांनी ट्विटरच्या माध्यमातून पुनरुच्चार केला. ‘नॅशनल डिफेन्स ऑथरायझेशन अँक्ट’च्या अंतर्गत पाकिस्तानकडून दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली जाते की नाही, याची पडताळणी सुरक्षा सचिवांना करता येते. मात्र या पडताळणीत हक्कानी नेटवर्क या दहशतवादी संघटनेविरोधात पाकिस्तानकडून समाधानकारक कारवाई करण्यात आली नसल्याचे आढळून आले आहे. हक्कानी नेटवर्क कडून अफगाणिस्तानात दहशतवादी कारवाया केल्या जातात आणि या कारवाया पाकिस्तानच्या वतीने करण्यात येतात, असेदेखील पो यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

मागील आठवड्यात अमेरिकेचे सुरक्षा सचिव मॅट्टिस यांनी पाकिस्तानला दिली जाणारी ३५0 मिलियन डॉलरची मदत रोखण्याचा निर्णय घेतला. हक्कानी नेटवर्कविरोधात कारवाई करण्यासाठी पाकिस्तानकडून पुरेशी पावले उचलली जात नसल्याचे मॅट्टिस यांनी म्हटले होते. ‘हक्कानी नेटवर्क कडून अफगाणिस्तानात दहशतवादी कारवाया केल्या जातात. मात्र तरीही पाकिस्तानकडून त्यांच्याविरोधात कारवाई केली जात नाही’, असे मॅट्टिस यांनी अमेरिकन संसदेला सांगितले होते. यानंतर अमेरिकेकडून पाकिस्तानला दिली जाणारी मदत रोखण्यात आली.

Comments
Loading...