अन् त्या प्राध्यापकाने चक्क कोरोनालाच लिहिलं पत्र

नक्की काय लिहिलं ते मजेदारही आहे आणि विचार करण्यासारखंही

0

लेखक, डॉ. संतोष संभाजी डाखरे: 

प्रिय कोरोना….
तसं तुला प्रिय म्हणावं अशी कोणतीच कामगिरी तू केली नाहीस, मात्र निव्वळ प्रघात असल्यामुळे इच्छा नसतानाही तुला प्रिय म्हणून संबोधावे लागत आहे. नुकताच तुझा वाढदिवस होऊन गेला. म्हणजेच तू या पृथ्वीतलावर येऊन आता वर्ष झालंय.

या वर्षपूर्तीनिमित्त तुला काही सांगावसं वाटतंय. अरेच्या.. विसरलोच. मी भलेही काही सांगेन; पण ऐकण्याकरिता तुझ्याकडे कान कुठे आहेत. आम्हीच तर तुला टाळ्या आणि थाळ्या वाजवून ठार बहिरं केलं होतं. असू दे , निदान हे पत्र सवड मिळाल्यास वाचून तरी घेशील. अरे देवा… परत विसरलो, भर उन्हाळ्यात दिवे, पणत्या, टॉर्च लावून आम्हीच तर तुला अंध करून सोडलं होतं. (कोरोनाकाळात तुम्ही काय दिवे लावलेत? असं आम्हाला आता कोणी म्हणूदेखील शकत नाही. कारण आम्ही ते आधीच लावले आहेत.)

मग आता पंचाईतच झाली म्हणायची. तरीपण अंतर्मन, सद्सदविवेकबुद्धी? जे काही तुझ्याकडे असेल त्याला स्मरून माझ्या भावना समजून घेशील अशी अपेक्षा बाळगतो. तुझा जन्म तसा चीनमधला. जन्माला आलास की तुला जन्माला घातलं, हे अजूनही कोडंच आहे. त्यातल्या त्यात तू अनौरस संतान असण्याचीच शक्यता अधिक. कारण तुझा जन्म अनेक दिवस जगापासून लपविण्यात आला होता.

चीनमधून तू या ना त्या मार्गाने जगभरात पोहोचल्याची खात्री झाल्यानंतरच तुझी ओळख करून देण्यात आली. मग जगभरात थैमान घालण्यास तू मोकळा झाला. आता पृथ्वीतलावर असा एकही प्रांत नाही, की जिथे तुझं अस्तित्व नाही. अविकसित- विकसित, गरीब-श्रीमंत अशा सर्वच देशांत तुझा मुक्तसंचार सुरू आहे. वर्ष झालंय तू अक्षरश: जेरीस आणलं सर्वांना.

अमेरिका, इंग्लंड, इटली, स्पेन, रशिया ही विकसित राष्ट्रे हतबल झालीत तुझ्यापुढे. मग इतरांची काय बिशाद! बरं तू एवढा अतिसूक्ष्म की, तुला चिरडावं म्हटलं तरी जमेना. लक्षणंसुद्धा वेगवेगळी धारण केलेली. तुझा रंग मात्र हिरवा असल्याचे आम्हास दूरचित्रवाणी आणि वृत्तपत्रांतून कळलं. तुला हिरवाच रंग घ्यायचा होता तर मग चीन ऐवजी पाकिस्तानात तरी जन्म घ्यायचा. तेवढाच आम्हाला धार्मिक रंग देता आला असता. (कारण रंगारंगांचं राजकारण करण्यात आम्हाला प्रावीण्य प्राप्त आहे.) पण तुझी राजकीय समज कमी पडली म्हणावी.

प्रसिद्धीच्या बाबतीत मात्र मानावं लागेल तुला. वर्षभरापासून तूच ‘ब्रेकिंग न्यूज’ ठरत आहेस. तुझ्या आड घसरलेला जीडीपी, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, महिला अत्याचार सारं काही झाकून गेलं बघ.

तुझ्यामुळे जगभरात काय काय झालं याची यादी लांबलचक आहे. अख्ख्या जगाचं अर्थचक्र थांबविण्याची किमया साधली तू. पैशाच्या मागे धावणाऱ्या माणसाला तू समज दिली. जिवापेक्षा पैसा मोठा नाही. हे तुझ्यामुळेच आम्हास कळलं. भल्याभल्यांचा माज उतरविलास तू. बरं तुझी दहशत एवढी की, माणसं माणसाला घाबरायला लागली. चार हात दूर राहायला लागली.

तसं ‘सोशल डिस्टंसिंग’ आम्हाला काही नवीन नव्हतं म्हणा. चातुर्वर्ण्य व्यवस्थेने ते आम्हास आधीच शिकविलं होतं. ते मास्क लावा आणि सँनिटायझर वापरा, हे मात्र आमच्यासाठी नवीन होतं. मुळात हात स्वच्छ धुण्यानेच अनेक आजारांपासून आपला बचाव होतो, हेच अनेकांना ठाऊक नव्हतं. तुझ्यामुळे मास्कची, सँनिटायझरची विक्री वाढली.

(त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला, दहा रुपयांचा मास्क 250 रुपयांना विकण्यात आला. असे काही लोक म्हणतात. ते मूर्ख आहेत) .एक मात्र ठीक झालं तुझ्यामुळेच मास्क, सँनिटायझर, पिपिई किट या बाबतीत भारत आत्मनिर्भर झाला. आरोग्यक्षेत्रात नवीन संशोधनं सुरू झालीत. काही काळाकरिता का होईना, सुस्तावलेली आरोग्ययंत्रणा कामास लागली. याकरिता तुझे आभार मानावेच लागेल.

तू लगेच निघून जाणार हा कयास मात्र चुकीचा ठरला. ‘मी पुन्हा येईल’ या घोषणेप्रमाणे तुझी दुसरी लाटही एव्हाना सुरू झाली. (या घोषणेच्या जनकालाही तुझी बाधा झाली. हा भाग वेगळा) तुझ्यापासून पूर्ण मुक्तीसाठी लस हाच एकमेव रामबाण उपाय असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.

 

म्हणून तर हल्ली लसीचेही राजकारण सुरू झाले आहे. आमच्या देशातील निवडणूक प्रचारात तुझ्यामुळे एका मुद्द्याची भर पडली हे तुला ठाऊक नसेल. राम मंदिर, ट्रिपल तलाक, एन.आर.सी.,कलम 370 च्या पंक्तीत मोफत कोरोना लसही येऊन बसली. केवढा हा मान तुला !

तुझ्या नियंत्रणाकरिता जगभरात लस निर्मितीचे प्रयोग सुरू आहे. अरबो-खरबोंचा हा खेळ आहे. तू आता स्वतःहून निघून जातो, असं ठरवलं तरीही या लस उत्पादक कंपन्या तसं होऊ देणार नाही. त्यांचं इप्सित साध्य होईपर्यंत त्या तुला जिवंत ठेवणारच.

तुझ्यामुळे मात्र अनेकांचे संसार देशोधडीला लागले. हे तुला मान्य करावेच लागेल. हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचे काय हाल झाले. स्थलांतरितांचे लोंढे तू बघितले असतीलच. बंद पडलेले कारखाने, हिरावलेले रोजगार, उपासमार, लाखोंच्या संख्येत मृत्यू, कर्तव्य बजाविताना पोलीस व आरोग्य कर्मचा-यांचे बळी, कोरोना बळींची अवहेलना, अर्थ व्यवस्थेचे तीन तेरा.

हे सगळं काही तुझ्यामुळे घडलं. तुझं एक चांगलं लक्षण म्हणशील, तर तू भेदाभेद पाळला नाहीस. जात-पात गरीब-श्रीमंत छोटा-मोठा असा भेद न करता तू सर्वांना स्पर्शून गेला. (नाही म्हणायला मरकजच्या निमित्ताने आम्ही तुला धर्माचं लेबल लावण्याचा प्रयत्न केला. मात्र तो फार यशस्वी झाला नाही, असो.)

पत्राच्या शेवटी एवढंच म्हणायचं आहे की, आता झालं ते झालं. जो काही गोंधळ घालायचा होतास तो तू घातलास. त्यातून अखिल मानव जातीनं जो घ्यायचा तो बोधही घेतला. आता आमचा अधिक अंत न पाहता तू निघून जावं. ही विनंती.

ताजा कलम :- तुझ्याविषयी आदरार्थी व छान- छान संबोधने वापरलीत म्हणून हुरळून जाऊ नकोस. आमचे वाचक सुज्ञ व सुसंस्कृत असल्याने ते अपरिहार्य होते. कधीकाळी एकटा भेटल्यास (लागण झाल्यास) खास ठेवणीतल्या शिव्यांच्या लाखोलीसाठी तयार राहशील. धन्यवाद.

तुझाच
अजूनही लागण न झालेला एक भारतीय

लेखक – प्रा. डॉ. संंतोष डाखरे 8275291596

हेदेखील वाचा

आज वणी तालुक्यात 7 पॉजिटिव्ह

हेदेखील वाचा

ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना व्हावी- कृती समितीची मागणी

 

 

 

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...