आयुष्यात खूप मोठे व्हा, पण समाजाला विसरू नका: डॉ. जाधव
कारंजा येथे गोर बंजारा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
कारंजा: आपण ज्या समाजात जन्मलो त्या समाजाचे देणं आपल्याला आहे हे कधीही विसरू नका. संत सेवालाल महाराज, डॉ. रामराव महाराज. मा. वसंतराव नाईक साहेब हे जर समाजाला विसरले असते. तर आज आपण इथे कदाचित नसतो. त्यांनी स्वतः तर पुढे गेले मात्र त्यानंतर त्यांनी आपल्या समाजाला पुढे घेऊन जाण्याचं कार्य केलं. त्यामुळे आयुष्यात खूप मोठे व्यक्ती व्हा पण समाजाला विसरू नका, असे प्रतिपादन डॉ. श्याम जाधव (नाईक) यांनी केले. रविवारी दिनांक 21 जुलै रोजी कारंजा येथे आयोजित गोर बंजारा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून होते. त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
स्थानिक वसंतराव नाईक सभागृहात दुपारी 11 वाजता गोर बंजारा समाजातील विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रा. भारत जाधव, ऍड अनिता राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन.गोरसेना कारंजा तालुक्याच्या वतीने केले होते. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या 108 व्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात 10 वी 12 वी तसेच सेट, नीट व जेईई परीक्षेत यश विशेष प्राविण्य प्राप्त करणा-या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी बोलताना डॉ. श्याम जाधव (नाईक) म्हणाले की…
अभ्यास म्हणजे केवळ पुस्तकी किडा होणे नाही. शाळा कॉलेजच्या अभ्यासासोबत सामाजिक क्षेत्र, कला, संस्कृती, साहित्य इत्यादी गोष्टीतही विद्यार्थ्यांनी रस घेणे गरजेचे आहे. अभ्यास करतानाच तुमच्यात असलेले इतर गुण आणि छंद ही जोपासले पाहिजे. वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या कार्याचा आजही देशभरात गौरव होतो. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रासोबतच राजकारण, समाजकारण, उद्योग, वैद्यकीय या क्षेत्रातही तरुणांनी झेंडा रोवला पाहिजे.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ऍड अनिता राठोड म्हणाल्या की विद्यार्थ्यांनी आधी ध्येय निश्चित करणे गरजेचे आहे. त्याला परिश्रमाची जोड दिल्यास ध्येय गाठण्यास अडचण जात नाही. आपल्या स्वप्नांनी परिश्रमाची जोड असल्यास जगातील कोणतेही ध्येय गाठणे कठिण नाही. असेही त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गोर बंजारा समाजातील नागरिक तसेच विद्यार्थी सहभागी होते.