मानोरा येथे पारंपरिक वाद्याच्या गजरात तिजोत्सव साजरा

मानोरा – मानोरा शहरातील नाईक नगर येथे बंजारा समाजाची संस्कृती आणि परंपरा जपणारा तिजोत्सव सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवाला सामाजिक कार्यकर्त्या मोहिनी इंद्रनील नाईक, डॉ कल्पना श्याम नाईक, डॉ. श्याम जाधव नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित पाहुण्यांचे बाबुसिंग राठोड (नाईक), सोमसिंग राठोड (कारभारी), विजय चव्हाण (कारभारी) व जेष्ठ समाज बांधव यांनी स्वागत केले.

रविवारी दिनांक 10 सप्टेंबर रोजी स्थानिक नाईक नगर येथील नाईकांच्या घरी सकाळी तिजोत्सवाला सुरूवात झाली. यावेळी उपस्थित बंजारा महिलांनी डफड्याच्या तालावर पारंपरिक गीत व नृत्य सादर केले. यावेळी मोहिनी नाईक व डॉ. कल्पना नाईक यांनी उत्सवात नाचणाऱ्या माता-भगिनीमध्ये सहभागी झाल्या होत्या. यावेळी बोलताना ऍड मोहिनी नाईक यांनी समाजाच्या प्रथा परंपरा टिकल्या पाहिजेत असे आवाहन केले. तर डॉ. श्याम जाधव नाईक यांनी अशा उत्सवातून सर्व समाज एकत्र येत असल्याने असे उत्सव मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे, असे मनोगत व्यक्त केले.

दुपारी तिजेची पूजा करण्यात आली. त्यानंतर मुली आणि महिलांनी ज्वाराच्या टोपल्या घेऊन मिरवणूक काढली. यावेळी पारंपरिक वाद्य आणि नृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी अनेक महिला या पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या. वाजत गाजत निघालेल्या या तिजेचे नदीत विसर्जन करण्यात आले. या उत्सवात मोठ्या संख्येने बंजारा समाज बांधव उपस्थित होते.

तीज हा बंजारा समाजाचा एक पारंपरिक व लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणारा उत्सव आहे. नारळी पौर्णिमेला तरुणी एकत्र येत तिजची (ज्वारा) पेरणी करतात. त्यानंतर रोज संध्याकाळी या तिजेला पाणी देऊन पूजा केली जाते. गोकुळ अष्टमीला किंवा त्यानंतर तिजेची तोडणी केली जाते व तिजेचे वाजत गाजत विसर्जन केले जाते.

Comments are closed.