प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मानोरा तालुक्यात द्या

मानोरा: वाशिम जिल्ह्यातील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मानोरा तालुक्यात द्यावे या मागणीचे निवेदन डॉ. शाम जाधव (नाईक) यांनी मानोरा तालुका विकास कृती समितीद्वारा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना दिले. मानोरा तालुक्यात वैद्यकीय सोयीसुविधांचा अभाव असल्याने ही रुग्णांची हेळसांड होते. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे मानोरा येथे मंजूर करावे अशी निवेदनातून मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुका हा सर्वात मागास तालुका आहे. शिवाय जवळपास 100 किमीच्या अंतरावर कोणतेही मोठे रुग्णालय नाही. त्यामुळे रुग्णांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. सध्या अकोला आणि यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयावर वाशिम जिल्ह्यातील रुग्णांचा ताण आहे. मानोरा हा यवतमाळ आणि अकोला जिल्ह्याच्या सीमेवर आहे. त्यामुळे मानोरा येथे महाविद्यालय झाल्यास वाशिमसह या दोन्ही जिल्ह्यातील रुग्णांनादेखील याचा फायदा होऊ शकतो.

शहरालगत 2 ते 3 किमी अंतरावर सुमारे 50 ते 100 एकर शासनाची जमीन आहे. त्यामुळे मानोरा तालुक्यात महाविद्यालय झाल्यास जागेची अडचण येणार नाही. शिवाय बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेले तीर्थक्षेत्र पोहरादेवी हे देखील मानोरा तालुक्यातच येते. येथे जगभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. परिसरात वैद्यकीय सुविधा नसल्याने या भाविकांना देखील त्रास होतो. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून मानोरा येथे महाविद्यालय मंजूर करावे अशी मागणी निवेदनातून डॉ. शाम जाधव (नाईक) यांनी केली आहे.

Comments are closed.