आमदारांच्या आश्वासनानंतर तिस-या दिवशी उपोषणाची सांगता

मानोरा: राज्य सरकारने वाशीम जिल्ह्यात मंजूर केलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मानोरा येथे द्यावे या मागणीसाठी सोमवारपासून साखळी उपोषण सुरू होते. आज बुधवारी उपोषणाच्या तिस-या दिवशी आमदार राजेंद्र पाटणी यांनी भेट देऊन याबाबत शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषणाला स्थगिती देण्यात आली. मानोरा कृती विकास समितीद्वारा हे आंदोलन करण्यात आले होते.

आज दिनांक 30 ऑगस्ट रोजी उपोषणाच्या तिस-या दिवशी उपोषण मंडपाला आमदार राजेंद्र पाटणी यांनी भेट दिली. त्यांनी कृती समितीच्या सदस्यांसोबत या विषयावर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी उपोषणकर्त्यांच्या मागणीचा शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन देत उपोषणकर्त्यांना उपोषण थांबवण्याचे आवाहन केले. आमदार पाटणी यांच्या आश्वासनानंतर कृती समितीद्वारा उपोषण थांबवण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शाम जाधव नाईक यांनी केले. यावेळी डॉ. संजय रोठे व सुनील धाबेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालुका हा सर्वात मागास तालुका आहे. शिवाय जवळपास 100 किमीच्या अंतरावर कोणतेही मोठे रुग्णालय नाही. त्यामुळे रुग्णांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. शिवाय बंजारा समाजाचे तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे जगभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. परिसरात वैद्यकीय सुविधा नसल्याने या भाविकांना देखील त्रास होतो. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून मानोरा येथे महाविद्यालय मंजूर करावे अशी मागणी कृती समितीद्वारा करण्यात आली होती.

Comments are closed.