माणसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे तुझे हीत व्हावे
माणसांचं हीत गाणाऱ्या महाकवी वामनदादा कर्डक यांची 98 वी जयंती शनिवारी
असे गीत गावे तुझे हीत व्हावे,
सर्वच वयांतील लोक त्यांचा वामनदादा म्हणूनच उल्लेख करतात. वामनदादादेखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर संकल्प करतात की ‘‘आम्ही तुझे संतान भीमा, आम्ही तुझे संतान, तुझा वारसा पुढे न्यावया, करू जीवाचे रान’’. 15 ऑगस्ट हा त्यांचा जयंती दिन.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील देशवंडी या गावात 15 ऑगस्ट 1922 ला त्यांचा जन्म झाला. तबाजी आणि सईबाई हे त्यांचे आईवडील. मीरा ही मुलगी जगली नाही. त्यानंतर त्यांनी रवींद्र या मुलाला दत्तक घेतलं. सदाशिव आणि सावित्राबाई ही त्यांची भावंडं. परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेता आलं नाही. त्यांना लिहिता-वाचतादेखील येत नव्हतं.
एकदा एक ज्येष्ठ नागरिक त्यांच्याकडे आलेत. त्यांनी वामनदादांना एक पत्र वाचून द्यावे अशी विनंती केली. वामनदादांना वाचता येत नव्हतं. वेळ मारून नेण्यासाठी त्या वयोवृद्ध माणसाला त्यांनी रागावून पाठवून दिले. या घटनेने ते अंतर्मुख झालेत. बीडीडी चाळीतील देहलवी गुरुजींजवळ जाऊन ते रडू लागलेत. त्यांनी वामनदादाला सांगितले, ‘अरे रो मत, छब्बीस तो अक्षर है, आठ दिन में सिख जाएंगा”. आणि केवळ आठच दिवसांमध्ये वामनदादा संपूर्ण बाराखडी शिकलेत.
जवळपास सन 1943 नंतर त्यांची कविता बहरायला लागली. वामनदादांच्या कवितेची प्रेरणा डॉ. बाबसाहेब आंबेडकर आणि त्यांचं क्रांतिकार्य ही राहिली आहे. ‘भीमवाणी पडली माझ्या कानी, तीच वाणी ठरली माझी गाणी’ या शब्दांत वामनदादा त्यांची प्रेरणा सांगतात. पहिल्या कवितेची प्रेरणा मिळाली ती किस्मत चित्रपटातील गीतातून.
हे गीत लिहिलं. हे पहिलं गीत लिहिलं तेव्हा त्यांचं वय केवळ 21 वर्ष होतं.
वयाच्या 15-16 व्या वर्षीच ते मुंबईत आले होते. मुंबईच्या झगमगाटी दुनियेत त्यांना बरंच काही शिकायला मिळालं. लहानपणी वामनदादांनी ‘संत तुकाराम’ हा चित्रपट पाहिला. ते संत तुकोबारायांमुळे अत्यंत प्रभावित झालेत. पुढे तुकोबारायांची क्रांती त्यांना कळली. जगद्गुरू तुकोबारायांप्रमाणेच आपलंही काव्य जनमुखी होऊन सर्वांपर्यंत पोहचावं, असं वामनदादांना वाटायचं.
प्रा. सागर जाधव हे वामनदादांच्या कवितेच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती देतात. त्यांच्यानुसार वामनदादांची 1943 ते 1956 ची कविता वेगळी ठरते. त्यांचं पहिलं गीत 3 मे 1943ला आलं. त्यांची 1956नंतरची कविता वेगळी ठरते. पारंपरिक संगीत आणि काव्यशास्त्राला वामनदादांनी एक नवा आयाम दिला.
जुनी चौकट त्यांनी मोडली. ‘पैगाम’ कवितेतून ते काव्य आणि संगीत यावर चर्चा करतात. वामनदादा कवीचे लोककवी झालेत. बुलडाण्याच्या गीत सुवर्ण महोत्सव स्मरणिकेत त्यांना 1993 मध्ये पहिल्यांदा “महाकवी” म्हटलं गेलं. पुढे चंद्रपूर जवळील बल्लारपूरला सन २००० मधे त्यांना “महाकवी” ही पदवी प्रदान करण्यात आली.
वामनदादांच्या कविता आणि गीतांतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जिवंत क्रांती उभी राहते. त्यांच्या कवितेत तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज, महाडचा लढा, गोलमेज परिषद, काळाराम मंदिराचा सत्याग्रह, कस्तुरबा गांधी यांची वेदना, अनेक ग्रंथ आदी विविधांगी विषयांवर चर्चा होते.
वामनदादांना तसं लौकिक शिक्षण मिळालं नव्हतं. तरी देखील त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा खूप विस्तिर्ण होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनेक ग्रंथांतील सार त्यांच्या गीतांतून आपल्याला पहायला मिळतो. बाबासाहेबांनी घेतलेली कोलंबियाची डिग्री असो, की कोणता लढा असो, वामनदादा अत्यंत सोप्या शब्दांतील गीतांतून मांडत.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील योगदानाला अधोरेखित करतात. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘‘मुंबई आमची थोर, या महाराष्ट्राची पोर। मुंबईवरती हक्क सांगती, कोण कुठले चोर।’’ हे प्रसिद्ध गीत लिहिलं. वामनदादांची गीतं म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेच्या चळवळीचं एक डॉक्युमेंटेशनच आहे.
महाराष्ट्रातील पाचही विद्यापीठांतून त्यांच्या साहित्यावर संशोधन कार्य सुरू आहे. वामनदादांनी सदैव माणसाचा ध्यास घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीला, क्रांतीला त्यांनी जवळून अनुभवलं. सामान्यांची मूक वेदना, संवेदना त्यांनी आपल्या गीतांतून बोलकी केली. 15 मे 2004 ला त्यांचं परीनिर्वाण झालं. या महामानवास त्यांच्या 98 व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.