नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण भावी पिढ्यांसाठी उज्ज्वल – ना. श्री. धोत्रे

संत गाडगेबाबा अम. विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर एकदिवसीय वेबिनारचे आयोजन

0
Sagar Katpis

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण देशामध्ये लागू झाले असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास त्यामधून होणार आहे. विद्यार्थ्यांच्या भावी उज्ज्वल पिढ्या घडविण्यासाठी आमूलाग्र परिवर्तन या शैक्षणिक धोरणात असल्याचे प्रतिपादन मानव संसाधन विकास, दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री ना. श्री. संजय धोत्रे यांनी केले. विद्यापीठाच्या आय.क्यु.ए.सी. विभागाच्यावतीने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर एकदिवसीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी नालंदा विद्यापीठाचे कुलपती तथा संगणकतज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर, अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर होते.

ना. धोत्रे म्हणाले, 34 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नवीन शैक्षणिक धोरण लागू झाले. त्याचे सर्व स्तरांवर स्वागत होत आहे. शिक्षणक्षेत्रात क्रांतिकारी बदल यानिमित्ताने होणार आहेत. सुरुवातीच्या पाच वर्षांमध्ये विद्यार्थ्यांवर महत्वाचे संस्कार शिक्षणातून होणार असल्यामुळे उत्कृष्ट विद्यार्थी घडण्यासाठी या धोरणामुळे फार मोठा हातभार लागणार आहे. शिक्षण, प्रशिक्षण, मातृभाषेतून शिक्षण, सर्व समावेशक अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांचे सतत मूल्यांकन यामध्ये होणार असून श्रमाची प्रतिष्ठा वाढणार आहे. नवीन विचार व अनुभवी शिक्षण, यांसह संशोधन व पदवी अभ्यासक्रमामध्ये बदल कसा असेल, यावर त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला. भारत महाशक्ती होण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणाची सर्वांनी अंमलबजावणी करण्याकरीता पुढे यावे, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

पद्मभूषण डॉ. भटकर म्हणाले, की या धोरणाची आपल्या देशात शांततेने अंमलबजावणी होत आहे. जगात सर्वात मोठे शिक्षणक्षेत्र भारतात आहे. विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पना, विचार यांना या अभ्यासक्रमामध्ये वाव मिळण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नॅशनल रीसर्च फाऊन्डेशन यासह विविधांगी बाजू यामध्ये दिलेल्या असून पहिले सहा वर्षे विद्यार्थ्यांना संस्कारक्षम होण्यासाठी महत्वाचे असल्याचे ते म्हणाले.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर म्हणाले, की मानवी विकासासाठी नवीन शैक्षणिक धोरण महत्वाचे असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास यामधून होणार आहे. सुरुवातीला गुरुकुल शिक्षणपद्धती संस्कारक्षम होती; पण ब्रिाटिशांनी आणलेल्या शिक्षणपद्धतीमुळे विचारांना आळा बसला. बहुभाषिक, बहुआयामी अशी ही शिक्षणपद्धती असून विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या विषयात आता शिक्षण घेता येणार आहे. नॅशनल रीसर्च फाऊन्डेशन, प्रशिक्षण व्यवस्था, मल्टी डिसिप्लीनरी महाविद्यालयांची स्थापना, क्लस्टरची व्यवस्था यामध्ये दिलेली आहे. मल्टी एन्ट्री यासह मल्टी एक्झिटची व्यवस्था या धोरणात असल्यामुळे विद्यार्थ्यांना टॅलेन्ट वाढविण्यासाठी मदत होणार आहे. विद्यापीठ या नवीन धोरणाची काटेकोरपणे अंमलबजावणी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी विविध मान्यवरांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे अतिथींनी दिली.

प्रास्ताविक भाषणातून प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर वेबिनार आयोजनामागील भूमिका विशद केली. आय.क्यु.ए.सी. संचालक डॉ.एस.एफ.आर. खाद्री यांनी संचालन केले. मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अविनाश मोहरील यांनी आलेल्या प्रश्नोत्तराचे सादरीकरण केले. आभार कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी मानले. विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.एफ.सी. रघुवंशी, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख, संगणक केंद्रप्रमुख डॉ. दिनेशकुमार जोशी, आय.आय.एल.चे संचालक डॉ.डी.टी. इंगोले यांसह आयोजन व तांत्रिक समितीचे सदस्य, विद्यापीठाच्या विविध प्राधिकारणींचे सदस्य, प्राचार्य, शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!