मंगळवारी शहरात डॉक्टर्स डे निमित्त IMA द्वारा रक्तदान शिबिर व भरगच्च कार्यक्रम

वैद्याकीय कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा, वृक्षारोपण व सभागृहाचा लोकार्पण सोहळा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: डॉक्टरला पृथ्वीवरचा चालता-बोलता देवच मानतात. त्यांचा मंगळवार दिनांक 1 जुलै रोजी विशेष दिवस डॉक्टर्स डे म्हणून साजरा होत आहे. येथील इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) शाखा त्यानिमित्त विविध कार्यक्रम विविध कार्यक्रम घेणार आहे. त्याचाच भाग म्हणून वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, पोस्टर प्रदर्शनी, कार्यशाळा आणि IMA च्या नवीन हॉलचे लोकार्पण होईल. यातील रक्तदान शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करण्याची विनंती IMA वणीचे अध्यक्ष डॉ. शिरीष कुमरवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

सोमवारी सकाळी 9 वाजता ग्रामीण रुग्णालय परिसरात आयएमएचे पदाधिकारी व सदस्य वृक्षारोपण करतील. स्थानिक बसस्थानकासमोरच आयएमएचा नवीन हॉल उभारण्यात आला आहे. त्याचे लोकार्पण सकाळी 9:30 वाजता होईल. सामाजिक कार्यकर्ते तथा ख्यातनाम स्त्रिरोगतज्ज्ञ डॉ. महेंद्र लोढा यांनी ही जागा संस्थेसाठी कायमस्वरूपी उपलब्ध करून दिली आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले करतील, तर अध्यक्षस्थानी महाराष्ट्र IMA चे पदाधिकारी डॉ. मंगेश गुलवाडे राहतील. वणी नगर परिषदचे मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे, तहसिलदार निखिल धुळधर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर थेरे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र सुलभेवार हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील.

उद्घाटनानंतर लगेच IMA हॉलमध्ये रक्तदान शिबिराला सुरूवात होईल. या शिबिरात वणीकरांसह, वणीतील डॉक्टर व त्यांचे कुटुंबीयदेखील रक्तदान करणार आहेत. नागपूर येथील लाईफलाईन ब्लड बँकेच्या सहकार्याने हे शिबिर होत आहे.

निरोगी आरोग्यासाठी पोस्टर प्रदर्शनी
जागतिक आरोग्य संघटना WHO ची 2025 ची थीम “निरोगी सुरुवात, आशादायी भविष्य” (Healthy Beginnings, Hopeful Futures) आहे. या विषयावर विद्यार्थ्यांसाठी पोस्टर मेकिंग स्पर्धा आयोजित केली आहे. या पोस्टर्सचे प्रदर्शन हॉलमध्ये लावण्यात येईल. तज्ज्ञ परीक्षकांच्या निष्कर्षांवरून मान्यवरांद्वारा निकाल जाहीर होईल. 

मेडिकल स्टाफसाठी ब्लड ट्रान्सफ्युजन कार्यशाळा
रक्त संक्रमन ही एक महत्त्वाची व जबाबदारीची प्रक्रिया आहे. त्यामुळे नर्स व मेडिकल स्टाफसाठी ब्लड ट्रान्सफ्युजन यावर IMA हॉल येथे दु. 4 वाजता कार्यशाळा होणार आहे. तर रात्री 9 वाजता IMA सदस्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. लाईफलाईन ब्लडचे डॉ. हरीष वर्भे व डॉ विराज वर्भे हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

IMA वणीचे अध्यक्ष डॉ. शिरीष कुमरवार, सचिव डॉ. संकेत अलोणे, उपाध्यक्ष डॉ. सुनील जुमनाके, सहसचिव डॉ. स्वप्निल गोहोकर आणि पदाधिकारी यांनी रक्तदान शिबिर व इतर सर्व आयोजित कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.