चिमुकल्या वल्लरीचे स्वातंत्र्यदिनी राज्यस्तरीय संमेलनात कवितावाचन
पाचव्या वर्गातील वल्लरीची काव्यप्रांतात भरारी
सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: स्वातंत्र्यदिनी ‘सुंदर माझी शाळा’ या फेसबूकपेजवर राज्यस्तरीय कविसंमेलन होत आहे. यात राज्यातील 16 जिल्ह्यांमधील 25 बालकवी कविता सादर करतील. यात वल्लरी क्षिप्रा मंगेश देशमुख हिचा विशेष सहभाग आहे.15 ऑगस्टला सायंकाळी 6 वाजता हे लाईव्ह कविसंमेलन होईल.
वल्लरी ही पुण्यातील डी. एस. के. स्कूलमध्ये पाचवीत शिकत आहे. तिचे वडील मंगेश देशमुख आणि आई क्षिप्रा डाखोडे देशमुख हे दोघंही पुण्यात पत्रकार आहेत. वल्लरीचं पहिलं जाहीर कवितावाचन गजलकार प्रदीप निफाडकर यांचं बोट धरून झालंय. एका दैनिकाच्या मैफलीत तिचा सातत्याने सहभाग असतो. प्रा. प्रवीण दवणे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात झालेल्या राज्यस्तरीय बालकवी संमेलनात तिची निवड झाली होती. शालेय मासिकात तिच्या कविता नेहमी प्रकाशित होतात.