7 दिवसात 10 दुकाने फोडली, वणीत भुरट्या चोरट्याचा हैदोस

आता मुख्य रहदारीच्या रस्त्यावरील दुकानेही सुरक्षीत नाही.... चोरटे सीसीटीव्हीत कैद होत असूनही चोरटे मोकाटच.... 4 महिन्यांपासून शहरात सातत्याने घरफोडी,

जितेंद्र कोठारी, वणी: भुरट्या चोरांचा हैदोस शहरात दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. चोरट्यांची मजल इतकी गेली आहे की त्यांनी एका आठवड्यात तब्बल 10 दुकाने फोडली. दि. 01 डिसेंबर च्या रात्री यवतमाळ मार्गावरील राजवी होंडा, प्रवीण हार्डवेअर, डायमंड बॅटरी, आमेर बॅटरी, नाझ बॅटरी, काकडे मशिनरी व एका डॉक्टरचा क्लिनिक चोरट्यांनी फोडले. यात डायमंड बॅटरी व काकडे मशिनरीमध्ये चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरे कैद झाली. त्यानंतर 5 व 6 डिसेंबरच्या रात्री चोरट्यांनी वरोरा मार्गावर 2 बुक डेपो, पतंजली स्टोर व सिद्दी विनायक मंगल कार्यालयाजवळ एका रेडिमेड व शू स्टोरचे कुलूप तोडून गल्यातील हजारो रुपये लंपास केले.

फोडलेल्या दुकानातील काही दुकानात दुकानातून केवळ चिल्लर रक्कम चोरट्यांनी लंपास केली, त्यामुळे त्यांनी पोलिसात तक्रार केली नाही. मात्र काही दुकानदारांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार केली असता पोलिसांनी एफआयआर दाखल केली नसल्याची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे चोरटे सीसीटीव्हीत कैद होत आहे. तसेच फुटेजवरून चोरीच्या सर्व घटना एकच चोरट्यांनी केल्याचे दिसून येत आहे. मात्र चोरटे सीसीटीव्हीत कैद होत असले तरी त्यांना गजाआड करण्यात पोलीस सातत्याने अपयशी ठरत आहे. दरम्यान 3-4 महिन्यांपासून शहरात सातत्याने घरफोडी, दुकानफोडीच्या घटना सुरू आहे. 

घरफोडीनंतर आता चोरट्यांचा दुकानकडे मोर्चा
शहरात गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून सततच्या चोरीच्या घटना होत आहे. सध्या चोरट्यांनी दुकानाकडे आपला मोर्चा वळवल्याने व्यापारी आता चिंतेत आले आहे. शहरातील मुख्य मार्गावरील दुकाने चोरट्यांनी फोडल्याने वणी पोलिसांची कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शहरात दररोज पोलीस पथक नाईट पेट्रोलिंग करत असल्याचे सांगण्यात येते. मग चोरीच्या घटनेच्या वेळी नेमके पोलीस पथक कुठे पेट्रोलिंग करत होते? हे शोधणे गरजेचे आहे.

चोरटे सीसीटीव्हीत कैद !
गेल्या 7 दिवसात घडलेल्या या चोरीच्या घटनेत काही दुकानातील सीसीटीव्हीत चोरटा कैद झाला आहे. याआधी मुकुटबन रोड येथील एक हार्डवेअरचे दुकान चोरट्यांनी फोडले होते. त्यातही चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला होता. मात्र त्याचा शोध लागला नव्हता. चोरटा सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतरही पोलिसांना चोरट्याला गजाआड करण्यात अपयश येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

गेल्या तीन ते चार महिन्यांपासून शहरात चोरी व घरफोडीच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहे. मात्र एकाही घरफोडीचा काही सुगावा पोलिसांच्या हाती आला नाही. परिणामी चोरीच्या घटनांना आळा बसलेला नाही. शहरात बंद घर म्हणजे घरफोडी असे एक समीकरण झाले आहे. चोरट्यांच्या भीतीने लोकांनी घर बंद करून बाहेर जाणे बंद केले आहे. मात्र दुकान रात्री बंद असते. त्यामुळे चोरट्यांनी दुकानांना टारगेट करणे सुरू केले आहे. दोन दिवसांआधी चोरट्यांनी शेतमालावर देखील डल्ला मारत 56 हजारांचा कापूस चोरला होता. अद्यापही चोरी व घरफोडीच्या घटनांना आळा न बसल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 

वणी पोलीस ठाण्यात मागील 53 दिवसांपासून ठाणेदराची खुर्ची रिकामी आहे. वणी पोलीस स्टेशन हे पोलिस निरीक्षक दर्जाचे असताना ठाण्याचा प्रभार महिला सहायक पोलिस निरीक्षक सांभाळत आहे. ठाणेदार नसल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांवर कोणाचाही वचक उरला नसल्याचे आरोप होत आहे. (व्हिडीओत सीसीटीव्हीत कैद झालेला चोरटा)

हे देखील वाचा: 

वणीतील पोलीस कर्मचा-याचा कर्तव्य बजावून परतताना अपघाती मृत्यू

कोलेरा येथील वेकोलि सबस्टेशन जवळ नरभक्षी वाघ जेरबंद

Comments are closed.