गांधी चौकातील गाळे लिलावाला स्थगिती देण्यास हाय कोर्टाचा नकार

न्यायालयाच्या निर्णयानंतर लिलाव अर्ज घेण्यासाठी व्यापाऱ्यांची नगर परिषद कार्यालयात गर्दी

जितेंद्र कोठारी, वणी: येथील गांधी चौकात नगर परिषदेच्या मालकीच्या 160 दुकान गाळ्यांच्या लिलाव प्रक्रियेला स्थगिती देण्याची व्यापारी संघटनेची याचिका नागपूर उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे गांधी चौकातील गाळे लिलाव प्रक्रियेचा मार्ग सुकर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्टे देण्यास नकार दिल्याची मिळताच व्यापा-यांची शेवटची आशा देखील मावळली. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी लिलाव फॉर्म घेण्यासाठी नगरपरिषद कार्यालयात एकच गर्दी केली.

उल्लेखनीय आहे की, माजी नगरसेवक पी.के. टोंगे यांच्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने गांधी चौकातील 160 दुकान गाळे लिलाव करण्याचे आदेश नगर रचना विभागाला दिले होते. त्या अनुषंगाने नगर परिषद प्रशासनाने लिलाव प्रक्रिया प्रारंभ केली आहे. लिलाव प्रक्रिया सुरू असताना येथील व्यापाऱ्यांना 21 नोव्हेंबर व 1 डिसेंबर 2022 रोजी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून लिलाव प्रक्रियेवर स्थगिती देण्याची मागणी केली होती.

उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गांधी चौकातील व्यापाऱ्यांकडे सर्वोच्च न्यायालय हा शेवटचा पर्याय आहे. मात्र न्यायालयीन प्रक्रियेत लागणारे वेळ तसेच उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाकडून न्याय मिळण्याची अपेक्षा कमी असल्याची खात्री व्यापाऱ्यांना झाली आहे. त्यामुळे लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी गांधी चौकातील अनेक व्यापाऱ्यांनी बुधवारी नगर परिषद कार्यालयातून लिलाव अर्ज विकत घेतले. बुधवार 7 डिसेंबर पर्यंत 350 अर्जाची विक्री झाल्याची माहिती नगर परिषद प्रशासनाने दिली आहे.

हे देखील वाचा: 

वणीतील पोलीस कर्मचा-याचा कर्तव्य बजावून परतताना अपघाती मृत्यू

कोलेरा येथील वेकोलि सबस्टेशन जवळ नरभक्षी वाघ जेरबंद

7 दिवसात 10 दुकाने फोडली, वणीत भुरट्या चोरट्याचा हैदोस

Comments are closed.