ढेप खरेदी करून 11.5 लाखांचा गंडा, गुन्हा दाखल

वणीतील एका जिनिंग चालकाची राजस्थानच्या व्यापा-याकडून फसवणूक

विवेक तोटेवार, वणी: ढेप खरेदी करून साडे अकरा लाख रुपये देण्यास टाळाटाळ करणा-या राजस्थान येथील ग्राहका विरोधात वणीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन वर्षांपूर्वीची ही घटना असून गेल्या अनेक महिन्यापासून आरोपी उर्वरीत रक्कम देण्यास टाळाटाळ करीत असल्याने अखेर फिर्यादीने याविरोधात तक्रार दिली.

सविस्तर वृत्त असे की, ब्राह्मणी रोड लगत चिखलगाव येथील रहिवासी असलेले सुनील कातकडे यांच्या मालकीचे साईकृपा जिनिंग आहे. यांच्या जिनिंगमध्ये कापूस खरेदी केली जाते. कापसापासून सरकी वेगळी झाली की उरलेल्या सरकी पासून ढेप काढणे व विक्री करण्याचे काम ही चालते. सरकीची ढेप ही दुधाळ जणावरांसाठी अत्यंत पोषक असते. यामुळे जनावरांच्या दूधात वाढ होते. मात्र उत्तर भारतात कापसाचे उत्पादन कमी असल्याने ही ढेप आपल्या परिसरातच स्वस्त व मोठ्या प्रमाणात मिळते. त्यामुळे तिकडील शेतकरी हे आपल्या भागात येऊन सरकीची ढेप विकत घेतात.

2018 मध्ये काही दलाल व व्यापारी यांनी यांच्या जिनिंगला भेट दिली. यावेळी त्यांनी दलाल मुरारी शर्मा, भीमचंद बन्सल, जगदीश प्रसाद सर्व राहणार राजस्थान यांच्या मार्फत आरोपी सुरेशकुमार रंजीतसिंग चहर रा.रा. निराधन ता. मलसीसर जिल्हा झुणझुनू राजस्थान यांच्यासोबत 1625 रुपये रेट ने 2371.87 क्विंटल ढेप चा सौदा झाला.

ठरल्याप्रमाणे सुनील कातकडे यांनी 11 मे 2018 ते 14 जून 2018 या कालावधीत पूर्ण ढेप पाठवली. ज्याची किंमत ठरल्याप्रमाणे 38 लाख 52 हजार 759 रुपये झाली. आरोपी सुरेशकुमार याने वेळोवेळी 26 लाख 95 हजार 30 रुपये कातकडे यांच्या बँक खात्यात जमा केले. परंतु उर्वरित रक्कम 11 लाख 57 हजार 725 रुपये देण्यास सुरेशकुमार टाळाटाळ करीत होता. त्यानंतर त्याने कातकडे यांचा फोन नंबर ब्लॉक केला.

शेवटी सुनील हे उर्वरित पैसे मागण्यासाठी राजस्थानला गेले. दलालांना घेऊन सुरेशकुमार कडे गेले असता सुरेशकुमार यांनी ‘पैसे पूर्ण दिले आहे आता पैसे देणार नाही व जे करायचे ते करा’ असे उत्तर दिले. शेवटी सुनील यांनी वणी पोलिसात सुरेशकुमार यांच्याविरोधात वणी पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून वणी पोलिसात आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम 402 नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास ठाणेदार शाम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी टिपूर्णे करीत आहे.

हे देखील वाचा:

ई-पॉस मशीन बंद पडल्याने धान्य वाटपात अडचणी

…आणि खुद्द नगराध्यक्षच राहायचे गैरहजर: सत्ता येऊनही तोटा झालेली टर्म

Comments are closed.