जब्बार चीनी, वणी: आज शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी तालुक्यात 15 कोविड रुग्ण आढळून आलेत. यातील 7 रुग्ण हे आरटीपीसीआर तर 8 रुग्ण ऍपिड ऍन्टिजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहेत. आज आलेल्या रुग्णांमुळे कोरोनाची एकूण रुग्णांची संख्या 338 झाली आहे. महसूल, आरोग्य, कोर्ट, पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय इत्यादी शासकीय विभागाच्या ठिकाणी कोरोनाचा शिरकाव झाल्याने याची लोकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. परिणामी या परिसरातील गर्दी काही प्रमाणात ओसरलेली दिसून येत आहे. आज शहरात तयार होत असलेल्या खासगी कोविड केअर सेंटरला स्थानिक रहिवाशांनी विरोध करत याबाबत तक्रार केली. त्यामुळे खासगी कोविड केअर सेंटरच्या कामाला संचालकांनी स्थगिती देत याचे काम थांबवले आहे.
आज यवतमाळहून 33 अहवाल प्राप्त झाले. यात 7 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 27 व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत. याशिवाय आज 26 व्यक्तींची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यात 8 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 18 व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये गांडलीपुरा, गुरुवर्य कॉलनी, भगतसिंग चौक इ. परिसरातील रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान आज 24 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी यवतमाळ येथे पाठवण्यात आले. अद्याप 235 संशयीत व्यक्तींचे रिपोर्ट यवतमाळहून येणे बाकी आहे.
सध्या तालुक्यात 338 पॉजिटिव्ह व्यक्ती आहेत. यातील 255 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. सध्या तालुक्यात 75 ऍक्टिव्ह पॉजिटिव्ह रुग्ण आहेत. तर तालुक्यातील कोरोनामुळे मृत्यू झाल्याची संख्या 4 झाली आहे.
आज 16 कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी
आज कोरोना मुक्त झालेल्या 16 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली. सध्या कोविड सेंटरला 42 व्यक्तींवर उपचार सुरू असून 33 रुग्ण होम आयसोलेट आहेत. यवतमाळ येथील जीएमसी येथे 14 व्यक्तींवर उपचार सुरू आहे. सध्या कोविड केअर सेन्टरमध्ये रुग्ण आणि संशयीत असे 70 व्यक्ती भरती आहेत.
शासकीय कार्यालयाची नागरिकांनी घेतली धास्ती
शासकीय कार्यालयात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने त्याकडे नागरिकांनी सध्या पाठ फिरवल्याचे चित्र आहे. तसेच या कार्यालयातील रुग्ण आलेला विभाग सिल करण्यात आला आहे. कोरोनाच्या धास्तीने केवळ महत्त्वाच्या कामासाठी कार्यालयात प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे कार्यालयातील गर्दी काही प्रमाणात ओसरली आहे. ग्रामीण रुग्णालयात एका डॉक्टरसह तीन कर्मचारी पॉजिटिव्ह आल्याने परिसरात चांगलीच दहशत पसरली आहे. त्यामुळे एरव्ही गर्दी असलेला रुग्णालयाचा परिसर सुनसान झाला आहे. सध्या ज्या विभागातील कर्मचारी कोरोना आढळून आले आहे तो विभाग सिल करण्यात आला आहे.
ग्रामीण रुग्णालयावरचा ताण वाढला
येथील एक डॉक्टर, एक नर्स व दोन कर्मचारी पॉजिटिव्ह आले आहेत. रुग्णालयातील डॉक्टरांची बदली झाल्याने तिथे अपुरा स्टाफची समस्या होतीच. त्यामुळे तिथे सध्या कर्मचा-यांची कमतरता आहे. एकीकडे अपुरे डॉक्टर व कर्मचारी तर दुसरीकडे कोरोनाचे वाढते रुग्ण यामुळे आरोग्य विभागावर चांगलाच ताण वाढला आहे.
वणीत सुरू होणारे खासगी कोविड केअर सेंटर परिसरातील रहिवाशांच्या विरोधामुळे सुरू होण्याआधीच बंद झाले आहे. आज स्थानिक रहिवाशांनी नगरसेवक नितीन चहाणकर यांच्या नेतृत्वात याबाबत एसडीओंना निवेदन दिले तसेच याबाबत आमदारांची भेट घेत याबाबत तक्रार दिली देऊन कोविड केअर सेंटरला परवानगी देऊ नये अशी मागणी केली होती. त्यानंतर संचालकांनी कोविड केअरचे काम थांबवण्याचा निर्णय़ घेतला. या निर्णयामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांचा खासगी उपचाराचा पर्याय आता बंद झाला आहे.
राजकारणातून खासगी कोविड सेंटरचा पद्धतशीर ‘गेम’ ?
वणीत खासगी कोविड केअर सेंटर सुरू होणार असल्याची माहिती समोर येताच याबाबत संमिश्र प्रतिक्रिया येत होत्या. याला स्थानिकांनी विरोध दर्शवला होता. तर स्थानिक ठिकाणीच अत्याधुनिक उपचार मिळणार असल्याने अनेकांनी याचे स्वागतही करण्यात येत होते. परिसरातील रुग्णांना शासकीय सह खासगी उपचाराचा पर्यायही खुला झाला होता. दरम्यान यात राजकारण शिरल्याने खासगी कोविड केअर सेंटरचा बळी गेल्याची चर्चा चांगलीच रंगत आहे. एकीकडे शासकीय कोविड केअर सेंटरमध्ये सोयी सुविधांचा अभाव असताना दुसरीकडे जाणूनबुजून खासगी कोविड केअरचा पद्धतशीर ‘गेम’ करण्यात आला अशी ही चर्चा सध्या रंगत आहे.
हे पण वाचा: खासगी कोविड केअर सेंटर सुरु होण्याआधीच बंद…. स्थानिकांचा प्रचंड विरोध