भास्कर राऊत, मारेगाव: बडग्याच्या तयारीने झोपलेल्या मारेगावकरांची आजची सकाळ खरफोडीच्या सत्राने उजाडली. अख्खी मध्यरात्र चोरट्यांनी शहरात धुमाकुळ घातला. अद्याप 14 घरी चोरी झाल्याचे उघड झाले असून अनेक लोक गावाहून घरी न परतल्याने तसेच ज्यांच्या घरी 1-2 हजारांचा मुद्देमाल लंपास झाला त्यांनी तक्रार करण्यासाठी इच्छुक नसल्याने नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाही. मात्र हा आकडा 14 ते 17 असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. चोरट्यांनी घरफोडी केलेल्या सर्व घटना माधव नगरी, ओम नगरी आणि निर्मिती नगर येथील आहे. या घरफोडीत लाखोंचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची शक्यता आहे. या घरफोडीमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. एकाच रात्री एवढ्या घरफोडी झाल्याने हे एखाद्या टोळीचे काम असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान या प्रकरणी डॉग स्क्वॉड आणि फोरेन्सिक एक्सपर्टची मदत घ्यावी अशी अपेक्षा मारेगावकर व्यक्त करीत आहे.
चोरट्यांचा मध्यरात्रीच बडगा !
पोळा आणि तान्हा पोळ्याच्या दोन दिवस सुट्या आल्या. गावी जाऊन पोळा साजरा करण्याची परंपरा आजही पाळली जाते. त्यामुळे मारेगावातील अनेक लोक गावी पोळा साजरा करण्यासाठी गेले. हिच संधी साधून चोरट्यांनी मारेगावातील माधव नगरी, ओम नगरी व निर्मिती नगरमध्ये घरफोडी केली. माधव नगरी येथे राजू डवरे, रमेश बोंडे, हेमराज कळंबे, संजय काकडे, सुंदरलाल आत्राम, देविदास भोयर, प्रभाकर जुमडे, संदीप राजगडे, सुनील भोयर, स्वाती आत्राम तर ओम नगरी येथे सुरज चिंचोलकर, कविश्वर चांदेकर यांच्यासह निर्मिती नगर येथील अविनाश लांबट व शेन्डे यांचा समावेश आहे.
सकाळी माधव नगरी व ओम नगरी येथील काही घरांचे कुलूप फोडलेल्या अवस्थेत शेजा-यांना आढळले. शेजा-यांनी तातडीने याची माहिती घरमालकांना दिली. काहींनी घरात प्रवेश करून बघितला असता आत सामान अस्ताव्यस्त होते. चोरट्यांनी कपाटाचे कुलूप फोडल्याचे ऐवज लंपास केल्याचे आढळले. घटनेची माहिती मिळताच घरमालक गावाहून परत आले. काही घरमालकांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. तर काहींनी मुद्देमाल जास्त किमतीचा नसल्याने तक्रार देण्याचे टाळले. सध्या या प्रकरणी लांबट आणि शेन्डे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.
फोरेन्सिक एक्सपर्टची घेणार मदत?
सदर घरफोडी एका व्यक्तीला करणे शक्य नसल्याने एखाद्या टोळीने या घरफोडी केल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे. एकाच रात्री एवढ्या घरफोडी होऊनही या प्रकरणी डॉग स्क्वॉड आणि फोरेन्सिक एक्सपर्टची मदत घेतली जात नसल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.सणावाराच्या दिवशी चोरटे डाव साधतात हे माहिती असूनही एकाच रात्री एवढ्या घरफोड्या झाल्या. त्यामुळे मारेगाव पोलिसांच्या कर्तव्यावर नाराजी व्यक्त केली जात आहे. डॉग स्क्वॉड आणि फोरेन्सिक एक्सपर्टच्या मदतीने तपास करण्यात यावा अशी अपेक्षा मारेगावकर व्यक्त करीत आहे.
या घरफोडीत किती ऐवज चोरट्यांनी लंपास केला याची संपूर्ण माहिती अद्याप आली नसली तरी हा ऐवज लाखोंच्या घरात असल्याचे बोलले जात आहे. पोलीस आता काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
Comments are closed.