पार्टी आली अंगलट… आज वणीत कोरोनाचा सिक्सर..

रजा नगरमध्ये 5 तर शास्त्रीनगरमध्ये 1 रुग्ण

0

जब्बार चीनी, वणी: आज कोरोनाने पुन्हा सिक्सर मारला आहे. विशेष म्हणजे यातील 5 रुग्ण हे एकट्या रजानगर येथील आहेत. तर एक रुग्ण हा शास्त्रीनगर येथील आहे. त्यामुळे आज कोरोनाचे वणीत 6 रुग्ण झाले आहे. रजा नगरच्या साखळी वाढत असून त्यात आता 7 रुग्ण झाले आहेत. तर शास्त्रीनगर येथील व्यक्ती यवतमाळ येथे एका पार्टीत सहभागी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

वणीतील पॉव्हर हाऊस रोडवर गोकुळ नगर समोर असणा-या रजा नगर येथील एक व्यक्ती बिहारला गेली होती. बिहार वरून परत आल्यावर त्या व्यक्तीची कोरोना टेस्ट केली असता ती पॉजिटिव्ह आली होती. काल रजा नगर येथील त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेली एक महिला पॉजिटिव्ह आल्यानंतर आज तब्बल 5 रुग्ण रजा नगर येथील आढळले आहेत. यात 3 पुरुष व 2 महिलांचा समावेश आहे.

पार्टी आली अंगलट
वणीतील शास्त्रीनगर येथील रहिवाशी असलेली एक व्यक्ती ही 10 ऑगस्टला यवतमाळ येथे गेली होती. तिथे ती व्यक्ती एका पार्टीत सहभागी झाली होती. ती व्यक्ती वणीत परत आली. मात्र त्यानंतर त्या व्यक्तीची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्या व्यक्तीने वणीतील एका खासगी डॉक्टरकडे तपासणी केली असता त्या व्यक्तीमध्ये सारीचे लक्षणं आढळून आलेेत. त्यामुळे डॉक्टरांनी त्या व्यक्तीला तात्काळ यवतमाळ येथे उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला.

13 ऑगस्टला ही शास्त्रीनगर येथील व्यक्ती यवतमाळ येथील जीएमसीमध्ये दाखल झाली. तिथे त्या व्यक्तीचे कोरोनाबाबत स्वॅब घेतले असता आज त्याचा रिपोर्ट आला. त्यात ती व्यक्ती पॉजिटिव्ह आढळून आली आहे. ती व्यक्ती पॉजिटिव्ह निघताच प्रशासनाने तातडीने त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 13 व्यक्तींना वणीतील कोविड केअर सेन्टरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

सध्या वणी तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या 62 झाली असून यात 49 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर सध्या 11 व्यक्ती पॉजिटिव्ह आहे. यातील 9 व्यक्तींवर परसोडा येथील कोविड केअर सेन्टरमध्ये उपचार सुरू असून 2 व्यक्तींवर यवतमाळ जीएमसी येथे उपचार सुरू आहे. तालुक्यात सध्या एकूण कंटेन्मेंट झोन 09 असून यातील शहरात 3 व ग्रामीण भागात 6 आहेत. दरम्यान आज 27 जणांची कोरोनाबाबत रॅपिड ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली असून यातील सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान प्रशासनाने कोरोनाला सहज न घेता योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.