मध्यवर्ती बँकेच्या ‘त्या’ संचालकावर अपात्रतेची टांगती तलवार

विभागीय सहनिबंधक यांनी बजावले कारण दाखवा नोटीस... 18 लाख 10 हजाराचे बनावट FDR प्रकरण

वणी बहुगुणी डेस्क: यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पाटण शाखेतून संकल्प मुदत ठेव योजनेच्या बनावट पावत्या तयार केल्या प्रकरणी बँकेचे संचालक राजीव मल्लारेड्डी येल्टीवार यांना कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 78 अ (ब) अन्वये विभागीय सह निबंधक सहकारी संस्था अमरावती यांनी दि. 18 नोव्हेंबर 2022 रोजी सदर नोटीस बजावली आहे. सहकार विभागाच्या या नोटीसमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

नोटीसमध्ये संचालक राजीव येल्टीवार यांनी बँकेचे पाटण शाखेचे व्यवस्थापक यांच्या सोबत संगनमत करुन 18 लाख 10 हजार रुपयांचे बनावट FDR तयार करुन बँकेमध्ये आर्थिक अफरातफर करण्यात सहभागी होणे, तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागाची फसवणूक केल्या प्रकरणी पाटण पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात भादंविच्या कलम 420, 467, 468 नुसार दाखल असलेल्या गुन्हाच्या अनुषंगाने त्यांना बँकेच्या संचालक पदावरून काढून टाकण्यात का येऊ नये ? असे नमूद करण्यात आले आहे. तसेच नोटीस मिळाल्याचे 15 दिवसांच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या प्रकरणी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी पाठपुरावा करत हा मुद्दा विधानसभेत उचलला होता.

य.जि.म.स. बँकेच्या पाटण शाखेचे 16 FDR बनावट असल्याचे उघड झाल्यावर आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी प्रधान सचिव सहकार विभाग महाराष्ट्र राज्य व सहकार आयुक्त पुणे यांच्याकडे लेखी तक्रार करून राजीव येल्टीवार यांचे बँक संचालक पद रद्द करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी आता कारणे दाखवा नोटीस आल्याने मध्यवर्ती बँकेच्या संचालकावर अपात्रतेची टांगती तलवार आहे.

Comments are closed.