जितेंद्र कोठारी, वणी: शेतक-याचा फडशा पाडणा-या नरभक्षी वाघाला पकडण्यासाठी जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून रेस्क्यू टीम कोलेरा येथे दाखल झाली. सध्या रेस्क्यू पथक व अधिकारी यांच्यात वाघाला जेरबंद करण्याबाबत नियोजन सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच वन संरक्षक यवतमाळ, उप वनसंरक्षक पांढरकवडा, वनपरिक्षेत्र अधिकारी वणी हे घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान शासनातर्फे मृतकाच्या कुटुंबीयांना 20 लाखांची आर्थि नुकसान भरपाई तर वेकोलिने 20 हजारांची तात्काळ मदत जाहीर केली. घटनेची माहिती मिळताच आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व मनसेचे राजू उंबरकर हे घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी गावकरी व मृतकाचे कुटुंबीय यांच्याशी चर्चा केली.
शेतात गुरांना चराईसाठी घेऊन गेलेले कोलेरा (पिंपरी) येथील शेतकरी रामदास पिदूरकर यांच्यावर रविवारी दुपारी वाघाने हल्ला करत ठार केले. आज सकाळी त्यांचा मृतदेह गावापासून 200 मीटर अंतरावर छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. एका आठवड्यात हा वाघाचा दुसरा हल्ला होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून सकाळपासूनच वनविभागाच्या विविध टीम शहरात दाखल होण्यास सुरूवात झाली. सकाळी पूसद येथून एक पिंजरा घेऊन रेस्क्यू व्हॅन वणीत दाखल झाली. तर दुपारी पांढरकवडा येथून मोठा पिंजरा मागवण्यात आला. दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास पुसद येथून 7-8 जवानांची एक रेस्क्यू टीम वणीत दाखल झाली. सध्या कोलेरा येथे पिंजरे कुठे लावायचे? पिंज-यात कोणता प्राणी ठेवायचा? कॅमे-याचे ठिकाण कोणते असावे इत्यादीसाठी नियोजन सुरू आहे. सध्या वनविभाग वाघाला रेस्क्यू करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहे.
मृतकाच्या कुटुंबीयांना 20 लाख रुपये
मृतक रामदास पिदूरकर यांच्या कुटुंबीयांना शासनाने 20 लाखांची मदत जाहीर केली असून त्यातील 10 लाखांचा चेक त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपुर्द करण्यात आला आहे. तर 10 लाख रुपये बँकेत फिक्स डिपॉजिट केले जाणार आहे. मृतकाच्या कुटुंबातील एका व्यक्तीला 15 हजारांच्या मासिक वेतनावर वनमजूर म्हणून अस्थायी (टेम्पररी) नोकरी देण्यात येणार आहे. वेकोलिने अंत्यसंस्कारासाठी 20 हजारांची तात्काळ रोख मदत केली आहे. गेल्या 11 वर्षांपासून कोलेरा गावाच्या पूनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. हा प्रश्न दोन वर्षात मार्गी लावणार असे आश्वासन वेकोलिच्या जीएम यांनी दिले. दुपारी 3 वाजता पिदूरकर यांचा मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी वणी येथे पाठवण्यात आला आहे. उत्तरिय तपासणीनंतर रात्री उशिरा त्यांच्यावर गावातच अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
हे देखील वाचा: