धक्कादायक…. आज कोरोनाचे 3 मृत्यू तर 36 पॉजिटिव्ह

वाढती मृत्यूसंख्या व रुग्णसंख्येमुळे तालुक्यात दहशत...

0

जब्बार चीनी, वणी: आज शनिवारी दिनांक 19 सप्टेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे मृत्यूतांडव दिसून आले. आज 3 रुग्णांचा मृत्यू झाला तर 36 व्यक्ती पॉजिटिव्ह आले. आज आलेल्या रुग्णांमध्ये 31 रुग्ण हे आरटीपीसीआर (स्वॅब) टेस्टनुसार आलेत तर 5 रुग्ण हे ऍपिड ऍन्टिजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहेत. आज आलेल्या रुग्णांमुळे कोरोनाची एकूण रुग्णांची संख्या 539 झाली आहे. दरम्यान आजचा दिवस खासगी कोरोना रुग्णालय प्रकरणामुळे नाट्यमय ठरला. स्थानिक नगरसेवकाच्या नेतृत्वात आज सुमारे 100 ते 150 व्यक्तींना लोढा हॉस्पिटलवर धावा बोलला व तिथे सुरू असलेले काम थांबवले. त्यामुळे वणीत खासगी रुग्णालय आता होणार की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

आज यवतमाळहून 69 अहवाल प्राप्त झाले. यात 31 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 38 व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत. याशिवाय आज 29 व्यक्तींची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यात 5 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 24 व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत. दरम्यान आज 22 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी यवतमाळ येथे पाठवण्यात आले. तर अद्याप 78 अहवाल येणे बाकी आहे. सध्या तालुक्यात 539 पॉजिटिव्ह व्यक्ती झाल्यात. यातील 390 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. सध्या तालुक्यात 134 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे मृत्यूची संख्या 14 झाली आहे.

आज तिघांचा मृत्यू, बेलदारपु-यात कोरोनाचा उद्रेक
आज आलेल्या रुग्णांमध्ये शहरात 24 रुग्ण आढळून आले आहेत. तर ग्रामीण भागात 12 रुग्ण आढळले. शहरात बेलदार पुरा येथे सर्वाधिक 8 त्यानंतर देशमुख वाडी येथे 6, सिंधी कॉलनी 4, टागौर चौक परिसर 3, सेवा नगर, गंगा विहार, शिवाजी चौक प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. ग्रामीण भागात राजूर येथे सर्वाधिक 4, वागदरा येथे 3 तर गणेशपूर 2 तर सुंदर नगर, भांदेवाडा, मांगरुळ येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. तर आज यवतमाळ येथे उपचार सुरू असलेल्या तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात वागदरा येथील एका 60 वर्षीय, राजूर येथील एका 47 वर्षीय तर शहरातील एका 74 वर्षीय वृद्धाचा समावेश आहे.

आज 20 कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी
आज कोरोना मुक्त झालेल्या 20 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली. सध्या तालुक्यात 134 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 55 व्यक्तींवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. तर 79 रुग्ण होम आयसोलेट आहेत. यवतमाळ येथील जीएमसी येथे 14 व्यक्तींवर उपचार सुरू आहे. सध्या कोविड केअर सेन्टरमध्ये रुग्ण आणि संशयीत असे 74 व्यक्ती भरती आहेत.

तेली फैलातील रहिवाशांचा हॉस्पिटलवर धावा…
आजचा दिवस अत्यंत नाट्यमय ठरला. स्थानिक नगरसेवकाच्या नेतृत्वाज आज शेकडो व्यक्तींनी लोढा हॉस्पिटलवर धावा बोलला. जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून इथे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलचे काम सुरू आहे. मात्र परिसरातील रहिवाशांच्या विरोधामुळे व या प्रकरणी होणा-या राजकारणाला कंटाळून संचालकांनी कोविड केअर सेंटरचे काम थांबवले आहे. या आधीही सत्यसेवा हॉस्पिटल येथे होणारे खासगी कोविड हॉस्पिटलचे काम हे स्थानिकांच्या विरोधामुळे थांबवण्यात आले होते. दरम्यान काम थांबवल्याने आता वणीत डेडिकेटेड हॉस्पिटल होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.