जितेंद्र कोठारी, वणी: घराजवळ खेळत असताना साचलेल्या खड्ड्यातील पाण्यात अचानक पडून एका दोन वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. शहरातील गोकुळनगर येथे आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास ही दुर्देवी घटना उघडकीस आली. प्रमोद सुनील पोटे असे या चिमुकल्याचे नाव आहे. तीन तासांच्या परीश्रमानंतर खड्यातील पाण्यात प्रमोदचा मृतदेह शोधण्यात यश आले.
गोकुळनगर येथे सुनील गंगाराम पोटे (40) हे त्यांच्या कुटुंबीयांसह राहतात. सुनील मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्यांना प्रमोद नावाचा दोन वर्षांचा मुलगा होता. पोटे यांच्या घरासमोरील सखल भागात एक मोठा खड्डा आहे. त्यात पावसाचे पाणी साचल्याने सदर खड्ड्याला छोट्या तलावाचे स्वरुप आले आहे.
आज शनिवारी दिनांक 4 सप्टेंबर रोजी सकाळी चिमुकला प्रमोद घराच्या अंगणात खेळत होता. 10 वाजताच्या सुमारास त्याचा आईला मुलगा दिसला नाही. त्यामुळे तिने घराजवळ शोधाशोध केली. मग मुलगा आढळला नाही. बराच वेळ मुलगा न दिसल्याने त्यांना मुलगा खड्यातील पाण्यात तर गेला नसावा असा संशय आला.
प्रमोदच्या वडिलांनी याची माहिती पोलीस ठाण्याला दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मुलाचा पाण्यात शोध घेण्यासाठी तातडीने रंगारीपुरा येथील किशन पांडुरंग मुळे, सुरेश राजू मुळे, नागेश कार्तिक मुळे यांना बोलवण्यात आले. त्यांनी पाण्यात कसून शोध घेतला. यावेळी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. अखेर 3 तासानंतर खड्यातील पाण्यात प्रमोदचा मृतदेह आढळून आला.
मृतदेह दिसताच मुलाच्या आईने हंबरडा फोडला. पोलिसांनी प्रमोदच्या मृत्यूची नोंद केली व मृतदेह पालकांच्या स्वाधीन केला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, तहसीलदार शाम धनमने पोहोचले. या दुर्दैवी घटनेमुळे गोकुळनगरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
Comments are closed.