बैल ‘सजवा’ पण पोळा घरीच ‘गाजवा’

यंदाही सार्वजनिक पोळा भरविण्याची परवानगी नाही

जितेंद्र कोठारी, वणी: ग्रामीण भागात वर्षातून एकदा येणारा बळीराजाचा उत्साहाचा आणि तितकाच आनंदाचा सण म्हणजे ‘पोळा’. कोरोनाच्या महामारीच्या प्रादुर्भावमुळे मागीलवर्षी पोळा, मारबत व तान्हापोळा घरीच साजरा करण्यात आला. यंदा सार्वजनिकरित्या बैलपोळा भरण्याची परवानगी शासन देईल अशी आशा बळीराजाला होती. परंतु कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी घरीच साध्या पद्धतीने बैलपोळा साजरा करण्याचे जिल्हाधिकाऱ्याचे आदेशामुळे शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

जिल्ह्यात दरवर्षी पोळा, मारबत, तान्हापोळा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येते. यंदा सोमवार 6 सप्टेंबर रोजी पोळा तसेच मंगळवार 7 सप्टेंबर रोजी तान्हापोळा सण साजरा करण्यात येणार आहे. वणी तालुक्यात कोरोना आजाराची तीव्रता कमी होऊन रुग्ण संख्या नगण्य आहे. मात्र राज्यात मागील काही दिवसापासून कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे.

तज्ज्ञांनी राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे शासनाने यंदाच्या पोळा सणनिमित्त बैल सजावट स्पर्धा, मिरवणूक, बैल धावण्याची स्पर्धा, शोभायात्रा, जत्रा यावर निर्बंध लावले आहे. मात्र बैलांना घरीच सजवून पूजा करण्याचे तसेच ज्या ठिकाणी काही धार्मिक परंपरा अमलात आणली जाते त्या, ठिकाणी जास्तीत जास्त 5 जणांनी कोरोना त्रिसूत्री नियमाचे पालन करून विधी पार पाडावी. असे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी निर्गमित केले आहे.

सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व इतर संबंधित कायद्यानुसार कार्यवाही करण्याचा इशारा ही आदेशात नमूद करण्यात आला आहे.

फक्त सार्वजनिक पोळ्यालाच मनाई
पोळा सोमवारी दिनांक 6 सप्टेंबर रोजी आहे. जरी सार्वजनिक पोळ्याला मनाई असली तरी ही शेतक-यांना घरीच विविध विधी पार पाडत हा सण साजरा करता येणार आहे. रविवारी संध्याकाळी बैलांची तूप व हळदीने खांदशेकणी करण्यात येणार आहे. वर्षभर बैलांच्या खांद्यावर ओझे असते. पोळ्याच्या निमित्ताने बैलांच्या खांद्याला तूप आणि हळद लावून शेकण्यात येते. पोळ्याचा पहिला दिवस म्हणजे वाडबैलाचा. यादिवशी मातीच्या बैलांची व घरच्या बैलजोडीची खांद शेकून महादेवाचे गाणे म्हणत हरहर महादेवाचा गजर करीत पूजा केली जाते. 

हे देखील वाचा:

श्रावणी गणेश मूर्ती मॉलमध्ये मातीच्या मूर्ती उपलब्ध

वणीतील पहिल्या फॅशन व इंटेरिअर इन्स्टिट्युटमध्ये प्रवेश सुरू

Comments are closed.