महिलेची प्रामाणिकता, सापडलेला मोबाईल केला परत
तान्हा पोळा कार्यक्रमात हरवला होता मोबाईल, महिलेचे कौतुक
पुरुषोत्तम नवघरे, वणी: तान्हा पोळा सणानिमित्त शासकीय मैदान, वणी येथे आयोजित नंदीबैल सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमादरम्यान एका महिलेला एका बेवारस मोबाईल सापडल्याची घटना घडली. मात्र सदर महिलेच्या प्रामाणिकतेमुळे सदर मोबाईल पोलिसांमार्फत मूळ मालकाला परत मिळाला.
दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास राखी कांबळे (रा. पंचशील नगर, वणी) आणि त्यांचे कुटुंबीय शासकीय मैदानावर तान्हा पोळा पाहण्यासाठी उपस्थित गेले होते. त्यावेळी त्यांना मैदानात एक बेवारस मोबाईल सापडला. प्रामाणिक हेतूने त्यांनी तो ताब्यात ठेवला आणि मोबाईल मालकाच्या कॉलची वाट पाहिली. मात्र, तासभरात मोबाईलवर कोणाताही कॉल आला नाही. शिवाय मोबाईल लॉक असल्याने त्यांना मोबाईल कुणाचा आहे हे देखील शोधता आले नाही. अखेर तासभर वाट पाहून राखी यांनी मोबाईल पोलीस स्टेशन वणी येथे पोहोचवून पोलीस हवालदार विकास घडसे आणि ललित नवघरे यांना सुपूर्द केला.
रात्री 9.00 वाजेपर्यंत कोणताही कॉल न आल्याने मालकाचा शोध लागला नाही. मात्र, रात्री उशिरा पूजा संकेत मेश्राम (रा. रंगनाथ नगर, वणी) यांचा फोन आला. त्यांनी हा मोबाईल त्यांचा असल्याचे सांगितले आणि पुरावे सादर केले. त्या खासगी रुग्णालयात कर्तव्यावर असल्याने त्यांनी महत्त्वाच्या कागदपत्रांसह माहिती मोबाईलमध्ये असल्याचे नमूद केले.
दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी पूजा यांनी त्यांचे पती संकेत नामदेव मेश्राम यांना पोलीस स्टेशनला पाठवले. शहानिशानंतर पोलिसांनी राखी कांबळे यांच्याकडून हा मोबाईल संकेत मेश्राम यांना परत केला. राखी यांनी कोणताही मोह न बाळगता प्रामाणिकपणा दाखवून समाजाप्रती आपुलकीची भावना जोपासली, ज्यामुळे हा मोबाईल मालकाला परत मिळाला. मेश्राम यांनी राखी यांचे आभार मानून त्यांच्या संवेदना व्यक्त केल्या व आभार मानले. राखी यांच्या प्रामाणिकतेचे सध्या कौतुक होत आहे.



Comments are closed.