परिसरात कोळसा तस्करांची धूम – 22 लाखांचा कोळसा जप्त

2.5 कोटींचा मुद्देमाल जप्त, वणी पोलीस व एलसीबीची कारवाई... कोळशा तस्करांचे धाबे दणाणले

जितेंद्र कोठारी, वणी: वणी पोलीस व स्थानिक गुन्हा शाखा पथकाने (LCB) मोठी कारवाई करत मुकुटबन येथील खासगी कोलमाईन्स मधून अवैधरीत्या कोळशाची वाहतूक करीत असलेले 8 हायवा ट्रक ताब्यात घेतले. बुधवारी पहाटे 5 वाजताच्या सुमाास वणी मुकुटबन मार्गावर पेटुर गावाजवळ सापळा रचून ही कारवाई केली. या कारवाईत प्राथमिक चौकशीनंतर 8 हायवामधील 20 लाख 80 हजार रुपयांचा कोळसा व 2 कोटी 21 लाख रुपये किमतीचे 8 ट्रक असे एकूण 2 कोटी 41 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. जप्त करण्यात आलेले सर्व ट्रक राज्य परिवहन महामंडळ डेपोमध्ये उभे करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांना गोपनीय माहिती मिळाली की, मुकुटबन येथील मे. बी. एस. इस्पात लि. च्या कोळशा खाणीतून रात्रीच्या वेळेस अवैधरीत्या कोळशाची वाहतूक होत आहे. मिळालेल्या माहितीची खात्री करून पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनात डीबी प्रमुख सपोनी माधव शिंदे व एलसीबी वणी शाखा प्रमुख सपोनि अमोल मुडे यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने पेटूर गावाजवळ सापळा रचला.

पहाटे 5 वाजता दरम्यान मुकुटबन मार्गावरून कोळसा भरून येत असलेले हायवा ट्रक आले. त्याची अडवून तपासणी केली असता चालकाजवल कोळसा वाहतुकी संदर्भात कागजपत्र आढळून आले नाही. त्यामुळे पोलिसांनी हायवा क्रमांक MH40BG 2658, MH34 BZ 2528, MH31 CQ 7466, MH31 CQ 4752, MH34 BZ 2529, MH 40 BG 0260, MH29 BE 4089 व MH34 BG 2478 या सर्व वाहनांना वणी पोलीस स्टेशनमध्ये आणले. पोलीस स्टेशन परिसरात वाहने उभी करण्याची जागा उपलब्ध नसल्यामुळे कोळसा भरलेले सर्व वाहन राज्य परिवहन निगमच्या वणी डेपोमध्ये उभे करण्यात आले आहे.

ताब्यात घेण्यात आलेले ट्रक

सदर कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अपर पोलीस अधीक्षक पियूष जगताप, उप विभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार, पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांचे मार्गदर्शनात सपोनी माधव शिंदे, सपोनी अमोल मुडे, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, महेश नाईक, सुधीर पिदुरकर, हरिंदर भारती, वसीम शेख, सतीश फुके, सुरेश किनाके यांनी केली.

वणी परिसरातील कोळसा तस्करांवर येणार टाच?
वणी परिसरात कोळसा चोरीच्या व्यवसायातून अनेक गब्बर झालं आहे. वेकोलfच्या कोळसा खाणीतून मोठ्या प्रमाणात कोळशाची चोरी व तस्करी होते. कोळसा तस्करी व ट्रान्सपोर्टच्या या अवैध व्यवसायात अनेक राजकारणी लोकांचे हितसंबंध जुळलेले असल्याचे बोलले जाते. याआधीही कोळसा तस्करांकडून वेकोलि सुरक्षा रक्षकांवर जीवघेणा हल्ला करून बळजबरीने कोळसा चोरी केल्याच्या अनेक घटनासुद्धा घडल्या आहेत. नवीन ठाणेदारांनी या मुजोर कोळसा तस्करांच्या मुसक्या आवळाव्यात अशी अपेक्षा सर्वसामान्य व्यक्त करीत आहे. आता ते यावर टाच आणणार का? हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

Comments are closed.