जब्बार चीनी, वणी: वणीत कोरोनाची दुसरी साखळी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आज गुरूवारी दिनांक 23 जुलै रोजी तेली फैलामधील आणखी एक व्यक्ती पॉजिटिव्ह आढळली आहे. त्यामुळे वणीत आता कोरोनाची एकूण रुग्ण संख्या 24 झाली आहे. सध्या वणीत दुसरी साखळी ऍक्टिव्ह असून पहिली (वरोरा रोड) व तिसरी (साई नगरी) साखळी खंडीत झाली आहे. तर राजूर येथे एक रुग्ण आढळून आल्याने ही रुग्ण आधीच्याच साखळीतील आहे, की ही नवीन साखळी आहे हे अद्याप कळू शकले नाही. जर ही नवीन साखळी असेल तर शहरात दुसरी व चौथी साखळी ऍक्टिव्ह असणार. दरम्यान जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन जिल्हाधिका-यांनी यवतमाळ, पांढरकवडा, नेर व दारव्हा या शहरात 31 जुलै पर्यंत संपूर्ण लॉकडाऊनसह संचारबंदी लागू केली आहे. ही संचारबंदी 24 जुलै रात्री 12 वाजेपासून लागू होणार आहे.
वणीतील कोरोनाची एकूण रुग्णसंख्या 24 झाली असून यातील 17 रुग्ण बरे झाले आहेत. तर 1 महिला दगावली आहे. सध्या ऍक्टिव्ह रुग्ण 6 असून त्यातील 5 रुग्ण एकट्या तेली फैलातीलच आहे. सध्या 260 व्यक्ती या हाय रिस्कमध्ये असून 429 व्यक्ती लो रिस्कमध्ये आहेत. आतापर्यंत 526 व्यक्तींच्या कोरोनाची टेस्ट घेण्यात आली असून यातील 98 टेस्ट या रॅपिड ऍन्टिजन पद्धतीने घेण्यात आल्या आहेत.
साई नगरीतील कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचे जोरदार स्वागत
वणीत साई नगरी येथे दोन रुग्ण आढळून आले होते. हे दोन्ही रुग्णांवर यवतमाळ येथे उपचार सुरू होते. त्यांनी कोरोनावर मात केली त्यातील पुरुष हा मंगळवारी 21 जुलैला तर आज दुपारी चारच्या सुमारास एक महिला परतली. घरी परतत असताना कॉलनीतील नागरिकांनी त्यांचे टाळ्या वाजवून व फुलं उधळून जोरदार स्वागत केले. एकीकडे कोरोना रुग्ण आढळताच त्याकडे समाजाचे बघणे अपराध्यासारखे असते. मात्र साईनगरीतील रहिवाशांनी बरे होऊन परत आलेल्या रुग्णाचे जोरदार स्वागत करून ‘हमे बिमार से नही तो बिमारी से लढना है’ हे दाखवून दिले.
लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीओ….