पुलावरून बाईक घेऊन जाणारा तरुण वाहून गेला, पण….

देव तारी त्याला कोण मारी...

0

नागेश रायपुरे, मारेगाव: ‘देव तारी त्याला कोण मारी’  या उक्तीचा प्रत्यय मारेगाव तालुक्यातील धामणी येथे आला. मोटारसायकलने नाल्याच्या पुलावरून जात असताना एक तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेला. त्या वाहून गेलेल्या तरुणाच्या डोळ्यासमोर साक्षात मृत्यू तांडव करीत होता. मात्र त्या वेळी असे काही घडले की त्या तरुणाला जीव वाचला.

आज गुरुवारी दिनांक 23 जुलै रोजी दुपारी परिसरात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे धामणीच्या नाल्याला मोठा पूर आला. दरम्यान तालुक्यातील गोंडबुरांडा येथील रहिवाशी असलेला अमर विलास देऊळकर (25) हा तरुण कपासी वरील फवारणीचे औषध घेण्यासाठी मारेगाव येथे आला होता. औषध घेऊन तो मोटारसायकलने (MH34-AE-3409) गावाकडे परतत होता.

अडीच ते तीन वाजताच्या दरम्यान अमर धामणी नाल्यावरील पुलाजवळ पोहोचला. त्या पुलावरून पुराचे पाणी वाहत होते. त्या तरुणाने हिम्मत करत मोटारसायकल पाण्यात टाकली. मात्र मोटारसायकल मधोमध गेल्यावर हेलकावे खाऊ लागली व मोटारसायकलसह अमर पुराच्या वाहून गेला. ही घटना तिथे उपस्थित असलेल्या काही तरुणांनी बघितली व ते त्याला वाचविण्यासाठी पुलाकडे धावले मात्र अमर तोपर्यंत दूरपर्यंत गेला होता.

देव तारी त्याला कोण मारी….
वाहून गेल्यावर काही अंतरावर या अमरच्या हाताला महादेव रांगनकर यांच्या शेतात एका झाडांची फांदी लागली. अमरने ती फांदी पकडून त्याचा आधार घेतला व मदतीसाठी जोरजोरात आरडाओरड केली. त्यावेळी शेजारीच धामणी येथील विजय बोधे. गजानन पाल इत्यादी तरुण होते. त्यांना मदतीसाठी कुणीतरी आवाज देत असल्याचा आवाज आला. त्यांनी लगेच त्या दिशेने धाव घेतली असता तिथे अमर पुराच्या पाण्यात एका झाडाच्या फांदीचा आधार घेतलेला दिसला. त्यांनी अमरला आधार देऊन पुरातून बाहेर काढले व त्याचे प्राण वाचविले. मात्र या घटनेत त्या तरुणाची मोटारसायकल व कपासी वरील फवारणीचे औषध पुरात वाहून गेले.

पुलाची उंची वाढविण्याची मागणी
मारेगाव ते कुंभा हा वर्दळीचा मार्ग आहे. धामणी येथील नाल्यावर बांधकाम विभागाने अतिशय कमी उंचीचा पुल बांधलेला आहे. दर पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडताच येथे पूर येऊन हा मार्ग बंद पडतो. अशा वेळेस वाहन चालक अनेक तास या ठिकाणी अडकून पडतात. तर काही वाहनचालक कंटाळून आपले वाहन नाल्यातून टाकतात. त्यामुळे दर पावसाळ्यात या पुलावर छोटे मोठे अपघात घडत असतात. त्यामुळे या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी धामणीतील नागरिक अऩेक वर्षांपासून करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.