जब्बार चीनी, वणी: शहरात कोरोनाचा तांडव सुरूच आहे. पोलीस, होमगार्ड, वेकोलि कर्मचारी यानंतर आता कोरोनाने डॉक्टरांमध्ये शिरकाव केला आहे. काल वणीत मेडिकल स्टोअरचालक पॉजिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. आज वणी शहरात 4 तर ग्रामीण भागात 1 व्यक्ती पॉजिटिव्ह आढळून आली आहे. यात 2 डॉक्टरांचा समावेश आहे. पॉजिटिव्ह व्यक्तीपैकी 3 व्यक्ती एकाच कुटुंबातील आहे.
आज शहरात निष्पन्न झालेल्या 3 पॉजिटिव्ह हे सर्वोदय चौक, तर एक व्यक्ती जत्रा रोड येथील आहे. ग्रामीण भागातील 1 व्यक्ती ग्रामीण भागातील आहे. सर्वोदय चौक येथील साखळी ही रंगारी पुरा येथील अंडा व्यवसायीकाची असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
आज आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या 126 झाली आहे. यातील 59 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. सध्या तालुक्यात 65 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. यातील कोविड केअर सेंटरमध्ये 59 व्यक्तींवर उपचार सुरु आहेत तर 06 व्यक्तींवर यवतमाळ जीएमसी येथे उपचार सुरू आहे. सध्या तालु्क्यात 17 कन्टेन्मेंट झोन असून यातील 10 शहरी भागात तर 7 ग्रामीण भागात आहेत.
कोरोना पसरवतोय हातपाय
आधी केवळ बाहेर येणा-या व्यक्तींमध्ये आढळणारा कोरोनाने आता शहरात हातपाय पसरवायला सुरूवात केली आहे. रुग्णांच्या सेवेत असणा-या डॉक्टरांमध्ये व त्यांना सहकार्य करणा-या मेडिकल स्टोअर चालकांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने परिसरात चिंता वाढली आहे. यासोबत सध्या आढळून आलेल्या रुग्णांमध्ये कोरोनाचे कोणतेही लक्षणं नसल्याचीही माहिती मिळत आहे. त्यामुळे शहरवासियांनी अधिकाधिक खबरदारी घेण्याची गरज आहे.