जब्बार चीनी, वणी: आजचा दिवस वणीसाठी चिंता वाढवणारा ठरला. आज वणीत एक महिला पॉजिटिव्ह सापडली आहे. त्यामुळे सदर महिला राहत असलेला सेवा नगर परिसर हा कॉनटेन्मेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) म्हणून घोषीत करण्यात आला आहे. आता सध्या वणीत प्रतिबंधित क्षेत्राची संख्या 3 झाली आहे. नवीन रुग्ण सापडताच प्रशासनाने हा संपूर्ण परिसर फवारणी करून निर्जंतूक केला. खबरदारी म्हणून प्रशासनाने आधीच सदर पॉजिटिव्ह महिलेच्या संपर्कात आलेल्या 9 जणांना परसोडा येथील कोविड केअर सेन्टरमध्ये कॉरेन्टाईन केले होते.
22 नवीन व्यक्ती हाय रिस्कमध्ये
आज 7 वा नवीन रुग्ण सापडताच या महिलेच्या संपर्कात आलेल्या 22 जणांना ट्रेस करण्यात (शोधण्यात) आले आहे. त्यातील 19 व्यक्तींना कोविड केअर सेन्टरमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर लो रिस्क मधल्या व्यक्तींना होम कॉरेन्टाईन करण्यात आले आहे. याशिवाय आणखी किती व्यक्ती संपर्कात होत्या याची माहिती प्रशासनातर्फे काढण्यात येत असून त्यातील हाय रिस्क व्यक्तींना कोविड केअर सेन्टरमध्ये भरती करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
आज 17 निगेटिव्हना सुट्टी
काल कोविड केअर सेन्टरमध्ये विलगीकरण कक्षात असणा-या 4 जणांना सुट्टी दिल्यानंतर आज आणखी 17 लो रिस्क व्यक्तींना विलगीकरण कक्षातून सुट्टी देण्यात आली आहे. सुट्टी देण्यात आलेल्या व्यक्त आता होम कॉरेन्टाईन राहणार आहेत. जर या व्यक्ती घराबाहेर निघाल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
जनता कर्फ्यू दरम्यान शासकीय कार्यालय, बँक सुरू
वणीमध्ये सोमवारपासून 5 दिवस जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय स्वयंस्फूर्तीने घेण्यात आला असून त्याला प्रशासनानेही हिरवी झेंडी दाखवली आहे. जनता कर्फ्यूच्या काळात शहरातील संपूर्ण व्यापारी प्रतिष्ठान बंद राहणार असून केवळ सकाळी 7 ते सकाळी 10 या वेळेतच दूध, शेतीउपयोगी साहित्य व औषधी या तीन खरेदी करता येणार आहे. दरम्यान जनता कर्फ्यूच्या काळात सर्व बँक व शासकीय कार्यालय राहणार असले तरी केवळ आवश्यक असेल तरच शासकीय कामासाठी बाहेर निघा असे आवाहन कऱण्यात आले आहे. तर ग्रामीण भागातील तसेच झरी व मारेगाव तालुक्यातील लोकांनीही जनता कर्फ्यूच्या काळात वणीला येणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.
सविस्तर वाचा: वणीत सोमवारपासून 5 दिवसांचा जनता कर्फ्यू