सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यात आज 3 रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे तिन्ही रुग्ण पुरुष असून मुकुटबन येथील आरसीसीपीएल या सिमेन्ट कंपनीतील कामगार आहेत. लॉकडाऊनमध्ये कामगार घरी गेले होते. मात्र कंपनी सुरु करण्यास सरकारने परवानगी दिल्यानंतर अनेक कामगार मुकुटबन येथे नोकरीसाठी परतले आहे. त्यातील तिन कामगार पॉजिटिव्ह असल्याचे आढळून आले. एकाच वेळी 3 रुग्ण आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
25 जुलै रोजी नागपंचमीच्या दिवशी रात्री 27 कामगार उत्तरप्रदेश येथून खासगी ट्रव्हल्सने मुकुटबन येथे परतले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी झरीला या कामगारांची तपासणी त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवून त्यांना होम कॉरन्टाईन करण्यात आले होते. 28 जुलैच्या रात्री त्याचा रिपोर्ट आला व त्यात 3 व्यक्ती पॉजिटिव्ह असल्याचे आढळून आले. या दोघांनाही कंपनीतून उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
दोन रुग्ण आढळताच आज 29 जुलैला सकाळी 8 वाजता तहसीलदार रामचंद्र खिरेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन गेडाम, गटविकास अधिकारी सुधाकर जाधव, तलाठी राणे, ठाणेदार धर्मा सोनुने इ. कंपनीत पोहचले व त्यांनी कामगार यांच्या राहत्या ठिकाणाची पाहणी केली. प्रशासनाने त्यांच्या घराचा 100 मीटरचा परिसर सिल केला आहे.
3 रुग्ण आढळताच आरोग्य विभागाने रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 75 जणांना कॉरन्टाईन केले आहे. यात 25 जण हायरिस्क, 17 जण मिडीयम रिस्क तर 33 जण लो रिस्क आहेत. प्रतिबंधित केलेल्या 100 मिटरमध्ये सुमारे 350 कामगार राहत आहे. दरम्यान सकाळी 8 वाजता प्रशासनातर्फे ग्रामपंचायत कार्यालयात मिटिंग घेतली जाणार होती. मात्र प्रशासकीय अधिकारी हे ग्रामपंचायतमध्ये न येता ते सरळ सिमेंट कंपनीत गेल्याने लोकप्रतिनिधींकडून संताप व्यक्त होत आहे.
अधिका-यांचे परस्पर कंपनीत जाणे संशयास्पद – लाकडे
प्रशासकीय अधिका-यांनी सरपंच तसेच पोलीस पाटील यांना विश्वासात घेणे गरजेचे होते. तसेच मी दक्षता समितीचा अध्यक्षही आहे. त्यामुळे आम्हाला याबाबत कोणतीही माहिती न देता अधिकारी परस्पर कंपनीत गेले. त्यांचे असे जाणे संशयास्पद आहे. गावकऱ्यांच्या हिताच्या व आरोग्याच्या प्रश्नावर जर प्रशासन आम्हाला विश्वासात घेत नसेल तर हे चुकीचे आहे. जर यांना आम्हाला गृहित धरायचेच नसेल तर माझ्या पदाला उपयोगच राहिलेला नाही. त्यामुळे आम्ही राजीनामा देऊन घरी बसणे केव्हाही योग्य –
– शंकर लाकडे, सरपंच मुकुटबन
हिंदू रामसेनेचे ग्रामपंचायत सचिवांना निवेदन
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आरसीसीपीएल कंपनीत राज्यातीलच कामगार घ्यावे असा आदेश असून कंपनी प्रशासन मात्र मुजोरी करीत उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, झारखंड, तेलंगणा व इतर अनेक राज्यातील कामगारांची भरती करीत आहे. कंपनी स्थानिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याने मुकुटबन येथील रहिवाशांचा जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने कंपनीला त्वरित टाळे ठोकावे अशा मागणीने निवेदन हिंदू रामसेनेच्या पदाधिका-यांनी ग्रामपंचायत सचिवांना दिले आहे.