कत्तलीसाठी नेणा-या 49 जनावरांची सुटका, खरबडा बनला तस्करीचा अड्डा

मध्यरात्री झाला तस्करीचा पर्दाफाश, तिघांना अटक

विवेक तोटेवार, वणी: अवैधरित्या कत्तलीसाठी तेलंगणात नेणारे वाहन बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडले. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. मिळालेल्या माहितीवरून घटनास्थळी पोहोचलेल्या वणी पोलिसांनी वाहनांसह 17 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त करून निजामाबाद येथील तिघांना अटक केली. आरिफ अल्लाबक्ष कुरैशी (53), शेख समीर शेख नन्हु (20) रा. उदूर, जि. निझामाबाद तसेच आयशर चालक शेख बबलू शेख फकीर (28), रा. धरमपूर, जि. निझामाबाद अशी आरोपींची नावे आहेत.

रेल्वे खरबडा परिसरातून जनावरे तस्करी होत असल्याच्या गोपनीय माहितीवरून सोमवारी मध्यरात्रीच्या दरम्यान, वरोरा रोड रेल्वे क्रॉसिंगजवळ एपी 24 टीबी 4799 क्रमांकाच्या आयशर वाहनाला बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी अडवले. या आयशर वाहनाची तपासणी केली असता, त्यात म्हशी आढळून आल्या. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. वणी पोलिस घटनास्थळी पोहोचले

पोलिसांनी वाहनांची झडती घेतली असता, आयशर वाहनात ८ ते १० वर्षे वयाची १२ म्हशी, १२ नग हेले तसेच ३ ते ४ वर्षे वयाचे २४ नग म्हशीचे पिल्लं असे एकूण ४९ जनावरे निर्दयीपणे वाहनात कोंबून आढळले. आयशर गाडीमध्ये चालकासह बसलेल्या इतर दोघांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, सदर जनावरे तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी नेत असल्याची कबुली दिली आहे.

शहरातील खरबडा परिसरातून हे जनावरे भरल्याची माहिती त्यानी दिली. पोलिसांनी आयशर वाहनातून ४९ जनावरांची सुटका करून त्यांच्या चारा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी उज्ज्वल गौरक्षण संस्थेमध्ये पाठविले. अटकेतील तिन्ही आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Comments are closed.