अबब…! वणीत शासकीय कार्यालयांसह धनदांडग्यांवर 5.5 कोटींचा मालमत्ता कर थकीत
जितेंद्र कोठारी, वणी: थकबाकी अधिक झाली की काही पानटपरी चालक थकबाकीदारांची लिस्ट प्रिंट करून पानटपरीवर लावायचे. वणी शहरात अनेकांनी हा फंडा वापरून वसुली करण्याचा प्रयत्न केला. काही प्रमाणात याला यशही आले. मात्र आता चक्क नगर पालिकेनेच थकबाकीदारांच्या लिस्टचे बॅनर बनवून ते पालिका कार्यालयात लावले आहे. शासकीय कार्यालयासह शहरातील अनेक गब्बर व्यक्तींचाही यात समावेश आहे. सध्या या बॅनरची शहरात चांगलीच चर्चा होत असून यात सुमारे 5.5 कोटीपेक्षा अधिक रक्कम थकीत असल्याची माहिती आहे. यात सर्वाधिक थकीत रक्कम ही प्रभाग क्रमांक 4 मधील आहे तर प्रभाग क्रमांक 7 ची थकीत सर्वात कमी आहे.
मालमत्ता कर हा नगर पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. शहरातील घर, दुकाने, मकान, फ्लॅट, बँका, कारखाने, शासकीय व खाजगी इमारती, प्लॉट यांच्यापासून मिळणाऱ्या वार्षिक मालमत्ता करातून शहरात विकास कामांना चालना दिली जाते. मात्र वणी शहरातील बहुतांश शासकीय कार्यालयासह काही कारखानदार व प्रतिष्ठित म्हणून गणल्या जाणाऱ्या धनदांडग्यांनी तब्बल 5.50 कोटी रुपये मालमत्ता कर थकविल्याची गंभीर बाब उघड झाली आहे.
वणी नगर परिषदेने 31 मार्च 2023 पर्यंत 20 हजार रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता कर थकबाकीदारांची यादी प्रसिद्ध केली आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 1 ते 8 मधील थकबाकीदाराच्या मालमत्ता क्रमांक, थकबाकीदाराचा नाव व थकीत मालमत्ता रक्कमसह फ्लेक्स बोर्ड नगर परिषद कार्यालयात दर्शनी भागात लावण्यात आले आहे. यात सर्वात जास्त 1 कोटी 95 लाख रुपये प्रभाग क्रमांक 4 मधील मालमत्ता धारकांकडे थकीत आहे. तर सर्वात कमी 19 लाख 25 हजार प्रभाग क्रमांक 7 मधील मालमत्ता धारकांकडून येणे बाकी आहे.
अनेक शासकीय कार्यालयांचा समावेश
विशेष म्हणजे केंद्र व राज्य शासनाच्या कार्यालय तसेच नागरिकांचा नेहमीचा संबंध येणारे पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, एसडीओ निवास, पंचायत समिती कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, दूरभाष कार्यालय, बांधकाम विभाग, वन विभाग, पशू संवर्धन विभाग, शिक्षण विभाग, एमआयडीसी कार्यालय, फॅक्टरी, शिक्षण संस्था तसेच काही प्रतिष्ठित बिल्डर्स व डेव्हलपर्सचा सर्वात जास्त मालमत्ता कर थकविल्याच्या यादीत समावेश आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक 4 मधील अशोका सिमेंट फॅक्टरीकडे सर्वात जास्त 32 लाख 41 हजार 513 रुपये मालमत्ता कर बाकी आहे. तर छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था कडून 25 लाख 16 हजार 216 रुपये मालमत्ता कर येणे बाकी आहे.
कोणत्या प्रभागात किती थकीत वसुली?
प्रभाग क्रमांक 1 मध्ये मधील 20 हजार रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता कर थकबाकीदारांकडून 81 लाख 4 हजार 60 रुपये, प्रभाग 2 मधून 50 लाख 38 हजार 399 रुपये, प्रभाग 3 मध्ये 26 लाख 912 रू., प्रभाग 4 मधून 1 कोटी 94 लाख 93 हजार 466 रू., प्रभाग 5 मध्ये 31 लाख 97 हजार 390 रू., प्रभाग 5 मध्ये 64 लाख 23 हजार 04 रू., प्रभाग 7 मधील नागरिकांकडून 19 लाख 24 हजार 924 रू. व प्रभाग 8 मधील मालमत्ता धारकांकडून 91 लाख 37 हजार 149 रुपये थकीत मालमत्ता कर वसूल करणे बाकी आहे.
गेल्या शनिवारी हे बॅनर पालिका कार्यालयाबाहेर लावण्यात आले आहे. पालिकेत येणा-या जाणा-या तसेच मार्केटमध्ये येणा-या जाणा-यांचे हे बॅनर लक्ष वेधत आहे. लिहिलेल्या रकमेबाबत काही समस्या असल्यास याबाबत पालिका कार्यालयात भेट द्यावी अशी सूचना देखील या फलकाच्या खालच्या बाजूस लिहीली आहे. तब्बल 5 कोटी 59 लाख 19 हजार 304 रुपये वसुलीसाठी मालमत्ता कर थकबाकीदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. ही वसुली करण्यासाठी नगर पालिका लवकरच धडक मोहीम राबविणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
Comments are closed.