वणीत अज्ञात रोगाने रोज 50 ते 60 वराहांचा मृत्यू

गावाच्या वेशीवरून सुरू झालेली साथ आता पोहोचली शहराच्या मध्यभागी

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील 50 ते 60 वराहांचा अज्ञात आजाराने रोज मृत्यू होत आहे. गेल्या एक महिन्यापासून हा प्रकार सुरू आहे. गेल्या एक महिन्यात सुमारे 1200 ते 1500 वराहांचा यात मृत्यू झाल्याची माहिती आहे. यामुळे काही भागात दुर्गंधीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. साथीच्या रोगाने जरी वराहांचा मृत्यू होत असला तरी त्याचा नागरिकांच्या आरोग्याला कोणताही परिणाम होणार नसल्याने वणीकरांनी घाबरू नये, असे आवाहन पशू वैद्यकीय अधिकारी यांनी केले आहे.

सदर रोग हा साथीचा रोग असल्याने एका वराहापासून दुस-या वराहापर्यंत हा रोग पोहोचत आहे. गेल्या एक महिन्याआधी शहरातील गोकुळनगर व चिखलगाव परिसरातून या प्रकाराला सुरुवात झाली. त्यानंतर पुढे दामले फैल, ग्रामीण रुग्णालय, बस स्थानक परिसर असे पुढे जात हा रोग सध्या शहराच्या मध्यभागापर्यंत पोहोचला आहे. सध्या माळीपुरा, भाजी मंडी परिसर, जटाशंकर चौक, रंगारी पुरा इत्यादी भागात हा रोग पसरला आहे. तर शास्त्री नगर या भागात या रोगाचा सर्वात अधिक प्रभाव दिसून येत आहे.

पालिकेची स्पेशल टीम कार्यरत
दरवर्षी साथीच्या रोगाने वराहाचा मृत्यू होतो. दरवर्षी हा आकडा दिवसाला 5 ते 10 असतो. मात्र यावर्षी हा आकडा एका दिवशी 50 च्या वर जात आहे. याचा वणीकरांच्या आरोग्यावर कोणताही परिणाम होऊ नये, तसेच परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरू नये म्हणून नगरपालिकेच्या आरोग्य विभागाची एक टीम घंटागाडीसह कार्यरत आहे. या टीममध्ये तिघे जण असून सर्व काळजी घेऊन ही टीम काम करीत आहे. मृत जनावरांना उचलून भालर रोडवरील डम्पिंग ग्राउंडमध्ये मोठा खड्डा खणून त्यात पुरण्यात येत आहे.
– भोलेश्वर ताराचंद, आरोग्य निरिक्षक, नगर पालिका

सध्या राज्यातील काही भागात आफ्रिकन स्वाईन फ्लूची साथ सुरू आहे. त्यामुळे वणीत असलेला रोग हा स्वाईन फ्लू किंवा पिगलेट एनीमिया असू शकतो. रोगाचे निदान करण्यासाठी लॅबमध्ये सॅम्पल पाठवले नसले तरी तशी मागणी झाल्यास किंवा गरज पडल्यास त्याचे सॅम्पल भोपाळ येथील लॅबमध्ये पाठवण्यात येईल. या रोगाचा शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर कोणताही परिणाम होणार नाही. पण नागरिकांनी वराहाच्या मृत्यूमुळे परिसर अस्वच्छ राहणार नाही याची काळजी घेणे गरजेच आहे. अशी माहिती पशू वैद्यकीय अधिकारी यांनी ‘वणी बहुगुणी’ला दिली.

शहरातून अचानक झाली वरहाची संख्या कमी
रोज मृत्यू होणा-या वराहांची संख्या 50 ते 60 आहे. तर स्वच्छतेसाठी एकच टीम सध्या तैनात आहे. ही संख्या अपुरी असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. तर वेळीच मृत जनावर न उचलल्याने अस्वच्छता वाढू शकते. गेल्या काही काळापासून शहरात मोठ्या प्रमाणात वराहाची संख्या वाढली होती. या साथीमुळे अचानक वराहाची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे याबाबत समाधान देखील व्यक्त केले जात आहे.

Comments are closed.