आत्महत्या करण्यापूर्वी एकदा..

वाचा सागर जाधव यांचे आर्टिकल

आत्महत्या करण्यापूर्वी एकदा..

सध्या सगळं जगच टेन्शनमध्ये आहे. शेतकरी असो बेरोजगार असो किंवा अन्य कोणीही सगळे जण आपापल्या प्रॉब्लेम्समध्ये आहेत. मात्र प्रत्येक काळोख्या रात्रीनंतर एक चिवचिवणारी पहाट येतेच. हे कधीही विसरू नये. काही दिवस कष्टाचे जातील. परंतु उद्याचा सूर्य आपलाच आहे. याचं भान आपण ठेवलंच पाहिजे. आत्महत्या हा शब्द जरी ऐकला किंवा कुठे वाचला तरी मनात एक चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. ते म्हणजे आपल्या आई-वडिलांचं ,आपल्या भावाचं, बहिणीचं किंवा आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या त्या सर्व व्यक्तींचं.

बरं ह्या एका प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाला माहितीच आहे की, हे सुंदर जीवन कितीदा मिळतं? फक्त आणि फक्त एकदाच. मग आत्महत्या करून सुंदर जीवन संपवायचं का ? तर नक्कीच नाही. जर तुम्हाला जीवन भरपूरदा मिळालं असतं, तर मग एक दोन वेळा आत्महत्या करायला काही हरकत नसती.

नऊ महिन्यांपेक्षा जास्त वेळ तुम्हाला पोटात ठेवून अत्यंत असह्य वेदना सहन करून आईने जन्म दिला. तुम्हाला लहानाचं मोठं केलं. कितीतरी गोष्टींचा त्याग केला.फक्त तुमच्या आनंदासाठी. तुम्ही आत्महत्या करुन संपूर्ण आयुष्याचं दुःख तुम्ही त्यांना देता. हे पाप कधीही करू नका. ज्या मायबापांनी आपल्यावरती अतोनात प्रेम केलं, उपकार केलेत त्यांची जाणीव आपण ठेवलीच पाहिजे.

ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे म्हणतात की, अडचणी कोणाला नसतात? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक समस्येला उत्तर असतेच. ती सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा, तर कधी माणसं. या तिन्ही गोष्टींच्या पलीकडील समस्या अस्तित्वातच नाही.

तरुण वयात असलेल्या मुलांच्या आत्महत्या करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. बरेच विद्यार्थी ताणतणामध्ये असतात. परीक्षांचे निकाल घोषित होतात. नंतर काही विद्यार्थी परीक्षेत मार्क्स कमी मिळाल्यामुळे किंवा नापास झाल्यामुळे आत्महत्या करतात. कारण परीक्षा आणि निकाल याच्या पलीकडे त्यांनी कधी आयुष्याचा विचार केलेलाच नसतो. त्यांना आयुष्याचं गणित समजलंच नसतं. आयुष्य म्हणजे परीक्षा व स्पर्धा नाही. ही गोष्ट समजली असती तर त्यांनी कधीही आत्महत्या केलीच नसती.

बऱ्याच नापास झालेल्या विद्यार्थ्यांनीच इतिहास घडवलेला आहे. कोणत्या शालेय किंवा महाविद्यालयीन अभ्यासक्रमात नापास होणं हे अपयश नाही. तुम्ही वर्षभर जे शिकलात त्याच्या स्मरणाची ही परीक्षा असते. ज्ञान हे अजरामर असतं. म्हणून परीक्षेत नापास होणं किंवा पास होणं ही दुय्यम गोष्ट आहे. ही गोष्ट त्यांना का कळली नाही किंवा वळली नाही. आयुष्य समजण्याच्या अभ्यासात ते कमी पडल्यामुळे टोकाचे निर्णय घेतात. प्रत्येकालाच माहिती आहे की, कोणतीही एक परीक्षा तुमचं जीवन ठरवू शकत नाही. कितीतरी परीक्षेच्या संधी असतात. कितीतरी परीक्षा आयुष्यात येतच असतात. करण्यासाठी भरपूर काही असतं. हजारो पर्याय जीवन जगण्यासाठी जवळ असतात. ही बाब प्रामुख्याने सर्वांनी समजून घ्यावी.

अनेकदा प्रेमात पडलेल्यांचे लग्न होत नाही. कधी कधी ब्रेक-अप होतं. काही कारणांमुळं दूर व्हावं लागतं. या कारणांमुळं ते आत्महत्या करतात. हे त्यांचं अज्ञान आहे. ती प्रेम म्हणजे काय हे समजू शकले नाही. एखाद्या प्रियकराला वाटतं की प्रेयसी नंतर पृथ्वीतलावरच्या सर्व मुली संपल्या असतील..? हे कुठपर्यंत योग्य आहे?

दूर गेल्यानंतर दुःख आणि वेदना होणारच. कारण एकमेकांकरिता आपण आयुष्य होतो. मनं जुळतात, विचार जुळतात. आपण आपलं आयुष्याच पणाला लावतो. सर्वस्वाचा त्याग करतो. तेव्हा त्या व्यक्तीचं दूर जाणं किंवा बदल होणं हे अत्यंत त्रासदायक, वेदनादायक व सहन करण्यापलीकडंच असतं. हे होणं साहजिकच आहे. कारण तुम्ही मनानं, विचारानं प्रत्येक गोष्टीनं त्या व्यक्तीवर प्रेम केलेलं असतं. दोघांचाही आत्मा एकमेकांशी जुळलेला असतो. म्हणून विचारांचा गोंधळ, रात्री झोप न येणं, अस्वस्थ होणं, रडणं, दिवसभर मन न लागणं  या सर्व गोष्टी काही दिवस नक्कीच जास्त प्रमाणात चालतील. हळूहळू त्रास कमी होईल. कदाचित त्या व्यक्तीचं आपल्यासोबत लग्न होणार नाही. ती व्यक्ती आयुष्यभर आपल्या सोबत राहू शकणार नाही. म्हणून काय प्रेम संपतं का ? तर नाही कारण प्रेम आयुष्यभर राहणारच आहे. फक्त एकमेकांचं शरीर वेगळं होत असतं.

काही गोष्टी एकदम बदलत असतात. अचानक झालेला बदल खूप जास्त त्रास देतो. कधी भेटणं, बोलणं, बंद होतं. एकमेकांची झालेली सवय यामधे अंतर निर्माण होत असतं. म्हणून वरील सर्व गोष्टींचा त्रास सहन करता आला पाहिजे. मनानं, आठवणीनं किंवा विचारानं नेहमी एकमेकांच्या जवळच राहिलं पाहिजे. दोघांचं प्रेम असेल आणि जर विरह असेल तरीदेखील चुकीचा निर्णय घेऊ नका. दोघेही जिवंत राहून प्रेम जिवंत ठेवू शकता. ही गोष्ट आपल्याला कळली पाहिजे. त्यासाठी आत्मचिंतनाची गरज आहे. आत्महत्या करणारी व्यक्ती ही आपल्या माय बापाचं भावा बहिणीचं प्रेम विसरलेली असते. ज्या व्यक्तीला प्रेमाची जाणीव असते ती व्यक्ती आत्महत्या सारख्या टोकाचा निर्णय घेतच नाही. एक अत्यंत साधा प्रश्न आहे. आपल्या आई-वडिलांना त्यांच्या मुलाबाळाच्या जीवापेक्षा काही महत्त्वाचं असतं का? तर प्रत्येकाचं उत्तर नाहीच असंच असेल.

म्हणून कधीही आत्महत्या करू नका. त्रास होत असेल तर एकदाच रडा वाटल्यास. एखादवेळी एकमेकांशी लढून कोणताच मार्ग निघत नसेल तर एकमेकांनी शांतपणे समजून घ्यायला हवं. समस्या सोडविण्याचा प्रयत्न करा; पण कधीही आयुष्याला फुलस्टॉप देऊ नका. कारण यामध्येच सगळ्यांचे हित असतं. ही गोष्ट आपल्याला समजली पाहिजे. तसंच आयुष्य कोणाकरिता थांबतं का ? किंवा थांबवून चालणार आहे काय? तर नक्कीच नाही. कारण आयुष्य थांबून चालणार नाही. आयुष्य संपवूनसुद्धा चालणार नाही. आयुष्य जगायचं असतं. कधी आपल्या आई-वडिलांसाठी , स्वतःसाठी तर कधी आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्तीसाठी. कारण तुम्ही ज्या ज्या व्यक्तीवर प्रेम करता त्या व्यक्तीसाठी तुम्ही खूप महत्त्वाचे असता. तुम्ही जीव असता हो त्यांचा. तुम्ही कधीही जीव द्यावा असं कधीही कोणालाही वाटत नाही. त्यांना तसं वाटणारही नाही.

तुम्ही नेहमी आनंदातच राहावं असंच वाटत असतं त्यांना. एकदा मिळालेलं हे सुंदर आयुष्य कधीही गमवू नका. कारण आयुष्य फार सुंदर आहे. तुमच्या भल्यासाठी तुमचे आई-वडील जगत असतात. फक्त तुमच्यासाठी स्वतःचं कंबरडं त्यांनी मोडलेलं असतं. तसंच तुमचं आयुष्य सुखासमृद्धीनं जावं यासाठी ते स्वतःच्या आयुष्याचा विचार न करता , आनंदचा विचार न करता आपल्या अपत्यासाठी ते संघर्ष करतात. वाटेल ते करण्याचा प्रयत्न करतात. तरीदेखील आपण मूर्खासारखं पाऊल उचलतो. खरंच हे चुकीचं नाही का? माझ्या मते, प्रेम म्हणजे एकमेकांच्या स्वार्थाचा विचार न करता किंवा एकमेकांकरिता स्वार्थी न राहून नेहमी आनंदी राहावं याकरिता दोघांचाही प्रामाणिक प्रयत्न म्हणजे प्रेम.

प्रेमात राहून आपल्याला अत्यंत आनंद होतो. तेव्हा एकमेकांपासून दूर होताना आपण दुःख सहन करण्याची ताकदसुद्धा आपल्यामध्ये निर्माण केली पाहिजे. या दोन्ही टोकांवर आपण स्थितप्रज्ञ असलं पाहिजे. ही गोष्ट आजच्या तरुण पिढीनं लक्षात घेतली पाहिजे. ब्रेकअप झाल्यानंतर स्वतःच आयुष्य उदध्वस्त करायचं की ते बनवायचं हे शेवटी आपल्याच हातात असतं. ही गोष्ट लक्षात घ्या. एक गोष्ट सांगतो. एकदा एक मुलगा आणि मुलगी एकमेकांवर फार प्रेम करीत होते. प्रेम झाल्यानंतर काही वर्षानंतर काही कारणास्तव त्यांचा ब्रेकअप झाला. ब्रेकअप झाल्यानंतर मुलगा स्वतःला सांभाळू शकत नाही. मुलगी मात्र स्वतःला सांभाळते. तीन वर्षांनंतर ते अचानक एकमेकांना भेटतात. तेव्हा ती मुलगी एका चांगल्या पदावर असते. सुंदर जीवन जगत असते. अखेर मुलगा स्वतःचं आयुष्य खराब करतो. आपलं स्वतःचं जीवन संपवतो. दुसऱ्या गोष्टीमध्ये जेव्हा दोघांचंही ब्रेकअप होतं तेव्हा ते दोघेही शांतपणे एकमेकांना समजून घेतात. एकमेकांपासून दूर होतात. दोघंही परिश्रम घेऊन मोठ्या पदावर जातात.

शेवटी सांगायचं एवढंच की,आत्महत्या केल्यानंतर फक्त तुम्ही फक्त एकटे मरत नाही. तुम्ही तुमच्या आई वडिलांना , भावाला, बहिणीला, तुमच्या जवळच्या मित्रांना या सर्वांना संपूर्ण आयुष्यासाठी तुम्ही दुःखी करता. त्यांना जिवंतपणी मरणवेदना देता. ही गोष्ट तुम्हाला का जीवन संपविण्याअगोदर कळत नाही ? मृत्यू झाल्यानंतर किंवा एखाद्या मुलाने किंवा मुलीने आत्महत्या केल्यानंतर आई वडिलांना, भावाला, बहिणीला, तुमच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या व्यक्तींना किती त्रास होत असेल? याचा विचारही तुम्ही करत नाही. आयुष्य निसर्गानं दिलेलं खूप मोठं वरदान आहे. त्याला जपा. स्वतः सुंदर जगा. इतरांना जगण्यासाठी मदत करा. एवढंच अपेक्षित आहे.

आयुष्यात वेदना असह्य झाल्या की आत्महत्येचा विचार येतोच. मग आत्महत्या केलीच पाहिजे का ? लॉर्ड फ्रान्सिस डेक्कन म्हणतो की चूक हा मानवी स्वभाव आहे आपण बरेचदा चुकतोदेखील. तुम्ही कर्ज घेतलं असेल. घरच्यांशी चुकीच्या पद्धतीने बोलले असाल. म्हणून आत्महत्या करायची का? अरे तुम्ही जेव्हा या सर्व गोष्टी तुमच्या घरच्यांना सांगता. जवळच्या मित्रांना सांगता. तेव्हा ते नक्कीच तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. म्हणून शेवटी एवढेच सांगतो. कधीही जीवनात आत्महत्याचा विचारही मनात आणू नका. विचार आलाही तरी आत्महत्या करायची अशी हिंमत तर कधीच करू नका. कारण समस्या कितीही मोठी असली तरी त्या समस्येचं निराकरण नक्की होऊ शकतं.

समस्या असतात. त्या सोडविण्याकरिता ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. स्वतःमध्ये एवढी ताकद नक्कीच तयार करावी लागेल. आयुष्यात कधी असंही होतं की आपल्या वेदना,दुःख आपल्याला फक्त त्याच एखाद्या व्यक्तीला सांगाव्याश्या वाटतात. ती एक व्यक्ती प्रत्येकदा आपल्याकरिता उपलब्ध असेलच किंवा वेळ देईलच असेही होणार नाही. आयुष्यात कोणाजवळही समस्या, वेदना,दुःख व्यक्त करता येत नाही. तरीसुद्धा स्वतःचं दुःख, वेदना, संघर्ष, समस्या स्वतः सांभाळू शकलो पाहिजे. एवढं कणखर स्वतःला बनवावंच लागेल.

म्हणून म्हणतो हे जीवन आपल्याला भाडेतत्त्वावर मिळालेलं आहे. आपण काही वर्षांकरिता या पृथ्वीवर आलेलो आहोत. ही गोष्ट आपण वारंवार का विसरतो? म्हणून म्हणतो फक्त एकदाच मिळालेलं आयुष्य बिनधास्त जगून घ्या. विल्यम शेक्सपियरने म्हटलेलं आहे की जे काही असेल ते व्यक्त करा. आपल्या आयुष्यात आनंद असेल तो व्यक्त करा. दुःख असेल ते व्यक्त करा. वेदना असेल ती व्यक्त करा. यावर सोल्युशन निघेल की नाही हे सांगता येणार नाही. मात्र वेदनांचं ओझं नक्कीच हलकं होईल. चला कितीही संकट येऊद्या आपण लढूयात. मात्र आनंदच जगूया.

सागर जाधव वणी,जिल्हा, यवतमाळ
 7038204209

Comments are closed.